श्री सदगुरु शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सामाजिक प्रबोधन

| लोकजागर | फलटण | दि. १६ ऑगस्ट २०२५ |

येथील श्री सदगुरु शैक्षणिक संकुलामध्ये भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. महेश साळुंखे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी श्री सदगुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिलीपसिंह भोसले, सचिव ॲड. सौ. मधुबाला भोसले, उपाध्यक्ष श्री. राजाराम फणसे, संचालक श्री. तेजसिंह भोसले, श्री सदगुरु प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. रणजितसिंह भोसले, ब्रिलियंट अकॅडमीच्या प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे श्री. अमोल सस्ते, संचालक श्री. संदीप जगताप, संस्थेच्या प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले, तसेच लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १० वी मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कुल आणि सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलमधील पहिल्या तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, मंथन स्पर्धेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी ‘मोबाईल व सोशल मीडियाचा अतिवापर’ या गंभीर विषयावर आधारित एक प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर शिवकालीन लाठी-काठी, दानपट्टा यांसारख्या मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि झान्ज पथकाचे शानदार सादरीकरणही करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्या सौ. नाजनीन शेख यांनी केले, तर आभारही त्यांनीच मानले. या सोहळ्यास सहकार महर्षी हणमंतराव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नागेश पाठक, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप चव्हाण यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love