आठ दिवसांत उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन – माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांचा इशारा
|लोकजागर | फलटण | दि.२० ऑगस्ट २०२५|
शहरात भटकी कुत्री व मोकाट जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांसह लहान मुलांचे जीवन धोक्यात आले आहे. चौकाचौकांत १० ते १५ कुत्र्यांची टोळकी दिसत असून, भरधाव वाहतुकीच्या चौकांत गुरांचे कळप रेंगाळत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. इतकेच नव्हे तर ही जनावरे नागरिकांवर हल्ला करू लागल्याने अपघात व जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.

या गंभीर समस्येकडे नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केला. “एखाद्या नागरिकाचा किंवा लहान मुलाचा जीव गेला तरच नगरपालिका हलणार का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
या समस्येवर आठ दिवसांच्या आत ठोस बंदोबस्त करावा, अन्यथा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महायुतीतील मित्र पक्षांच्या वतीने नगरपालिकेसमोर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
