गोविंद मिल्कच्या ३० वर्षांच्या वाटचालीत दुग्ध व्यवसायाने ग्रामीण भागाला दिला दिलासा : आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

। लोकजागर । फलटण । दि. 24 सप्टेंबर 2025 ।

गोविंदच्या माध्यमातून फलटण तालुक्यात सुरू झालेला दुग्ध व्यवसाय आज प्रमुख व्यवसाय ठरला असून सन 2003-2004 च्या दुष्काळात याच व्यवसायाने ग्रामीण भागाला तारले, तसेच महिला आणि तरुणांना उद्योजक होण्याची संधी दिली, असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काढले. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., फलटणच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार दिपकराव चव्हाण, गोविंदचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. मिथिलाराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास दूध उत्पादक, सेंटर चालक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या ३० वर्षांत तालुक्यातील दुग्ध व्यवसाय सुधारणे, बिघडलेले साखर कारखाने दुरुस्त करणे, दुष्काळी भागासाठी कृष्णा नदीचे पाणी आणणे आणि तालुक्याच्या विकासाला योग्य दिशा देणे या सर्व कामांमध्ये गोविंदची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचे आ. श्रीमंत रामराजे यांनी सांगितले. संजीवराजे यांच्या प्रयत्नांतून गोविंद हा दर्जेदार आणि विश्वासार्ह ब्रँड निर्माण झाला असून महिलांना व तरुणांना आत्मविश्वास देत उद्योजक म्हणून घडविण्यात याचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गोविंदने दूध उत्पादकांच्या हितासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. दर्जेदार दूध उत्पादनासाठी विशेष प्रशिक्षण, पशुखाद्य, जास्त दूध देणारी जनावरे, कमी खर्चात अधिक उत्पादन या उपक्रमातून दूध उत्पादकांचे हित जपण्यात आले. त्यामुळे आज गोविंदची उत्पादने महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देश-विदेशात पोहोचली असून गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाली आहेत.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मदतीने १९९५ मध्ये केवळ २०० ते २५० लिटरने सुरू झालेले दूध संकलन आज एका केंद्रावर ३० ते ३५ हजार लिटरपर्यंत वाढले आहे. गोविंद दररोज सुमारे ७ लाख लिटर दूध संकलित करून विविध दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती करत आहे. यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून सुरू झालेला दुग्ध व्यवसाय हा आज मुख्य व्यवसाय ठरला असून महिला व तरुण वर्ग उद्योजक म्हणून पुढे आला आहे.

ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ‘धवलक्रांती’ घडली असून कृष्णा पाणी प्रकल्पामुळे हरितक्रांतीही साध्य झाली आहे. या दोन घटकांमुळे तालुक्याच्या विकासात नवे पर्व निर्माण झाले असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

आगामी काळात आयात होणाऱ्या स्वस्त दुधामुळे स्थानिक दुग्ध व्यवसायावर संकट येण्याची शक्यता असून, त्याला तोंड देण्यासाठी गोविंदतर्फे अधिक दूध देणाऱ्या कालवडींची निर्मिती, दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि कमी खर्चात अधिक उत्पादन यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे स्वागत डॉ. गणेश सपकाळ यांनी केले. डॉ. शांताराम गायकवाड यांनी प्रास्ताविक मांडले. कार्यकारी संचालक धर्मेंद्र भल्ला यांनी गोविंदच्या प्रगतीचा आढावा घेत आव्हानांवर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला. समारोप व आभार प्रदर्शन डॉ. माधुरी ढमाले यांनी केले.

दरम्यान, दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात “आता होऊ द्या धिंगाणा” आणि समीर चौगुले यांच्या “सम्या सम्या” या मनोरंजनात्मक मैफिलीही रंगल्या. या कार्यक्रमासाठी प्रदीप कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.


Spread the love