धुमाळवाडीत रानभाजी ओळख व संवर्धन कार्यशाळा उत्साहात संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. 25 सप्टेंबर 2025 ।

फळांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथे दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी ‘रानभाजी ओळख व संवर्धन’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रानभाज्यांचे आहारातील महत्त्व पटवून देणे आणि त्यांचे संवर्धन घडवून आणण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

या कार्यशाळेचे आयोजन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे-16 (स्वायत्त), महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ नागपूर, तालुका कृषी विभाग फलटण आणि धुमाळवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसाठी रानभाजीवर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच महिला बचत गटांनी रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले आणि पौष्टिक उपवासाचे पदार्थ तयार करून पाककृतींची प्रात्यक्षिके सादर केली. या प्रदर्शनात 20 पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलिद मोमीन, सहाय्यक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र विभाग, मॉडर्न महाविद्यालय पुणे) डॉ. प्राची क्षीरसागर, विभागीय सल्लागार (महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे विभाग) विलास बच्चे, जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी, जिल्हा प्रकल्प सल्लागार अभिजीत काटकर, मंडळ कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे, उपकृषी अधिकारी अजित सोनवलकर, कृषी सेवा रत्न सचिन जाधव, ग्रामसेविका मोनीका सावंत, मुख्याध्यापिका स्मिता अडसूळ, वनरक्षक प्रियंका पालवे, सहायक कृषी अधिकारी सुनील सोनवलकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. खलिद मोमीन यांनी रानभाज्यांचे दैनंदिन आहारातील महत्त्व अधोरेखित केले, तर डॉ. प्राची क्षीरसागर यांनी रानभाज्यांचे संवर्धन, लागवडीची तंत्रे आणि पुढील पिढीसाठी त्यांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी केले. गावातील उपक्रमशील शेतकऱ्यांचा सन्मान करून कार्यशाळेची सांगता “रानभाजी खाऊ… निरोगी राहू” या घोषवाक्याने करण्यात आली.

Spread the love