। लोकजागर । फलटण । दि. 30 सप्टेंबर 2025 ।
फलटण शहरात सायंकाळच्या प्रहरात पारंपरिक ढंगात दांडिया व गरबा नृत्याचा महिलांनी मनमुराद आनंद घेतला. निमित्त होते स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या वतीने आयोजित दांडिया रास स्पर्धा 2025 या सोहळ्याचे.

स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या वतीने महाराजा मंगल कार्यालयात या दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. गौरीताई पाटील, स्वयंसिद्धा महिला संस्थेच्या अध्यक्षा ऍड. सौ. मधुबाला भोसले, सौ. सुजाता यादव, सौ. शिवांगी बोरावके, सौ. प्रतिभाताई शिंदे, सौ. काजल भोईटे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
हिंदी व मराठी गीतांवर सजविलेल्या विद्युत रोषणाईच्या स्टेजवर मुलींनी व महिलांनी पारंपरिक घागरा-चोळीच्या वेशभूषेत दांडिया व गरबा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी संसारिक जबाबदाऱ्यांपासून वेळ काढत मनसोक्त नृत्याचा आनंद लुटला.

स्पर्धेतील विजेत्या दांडिया ग्रुपला मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सानिका भोईटे यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, बारामती चे रोहीत अवूदे व सौ. चैत्राली उबाळे यांनी कामकाज पाहिले. स्वागतपर भाषण संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी केले तर शेवटी त्यांनीच आभारप्रदर्शन केले.
