‘लोकजागर’ च्या 46 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
। लोकजागर । फलटण । दि. 26 ऑक्टोबर 2025 ।
‘‘मराठी साहित्याला चांगला चेहरा, चांगला अनुभव आणि चांगला आशय देण्याचं काम आज ग्रामीण भागातून सातत्याने होत आहे. त्या सातत्याच्या परंपरेत ‘लोकजागर’ दिवाळी अंक आहे. कुठलाही प्रस्थापित लेखक यात नाही हे देखील या दिवाळी अंकाचे वेगळे वैशिष्ठ्य आहे; कारण यातूनच नवे साहित्यिक घडतील,’’ असे विचार ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.

‘लोकजागर’च्या 46 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ‘दिवाळी पाडवा’ या शुभदिनी किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते येथील ‘लोकजागर’ कार्यालयात संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री सद्गुरु व महाराजा संस्था समुहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी – बेडके, ज्येष्ठ साहित्यिक ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे, ‘लोकजागर’चे संस्थापक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

किशोर बेडकिहाळ पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील वाड्.मयीन विश्वामध्ये दिवाळी अंकांना विशेष महत्त्व आहे. दिवाळी अंकांचा सुरुवातीचा काळ हा मोठ्या शहरांमध्ये केंद्रीत झालेला होता. ग्रामीण भागात लोक लिहायला लागले. त्यातून ग्रामीण जीवनाचे प्रश्न मांडले जावू लागले. यातून साहित्य चळवळीचे विकेंद्रीकरण झाले व एका अर्थाने साहित्याचा भूगोल बदलला. यामध्ये ग्रामीण भागातून प्रसिद्ध होणार्या दिवाळी अंकांचा मोठा वाटा आहे.’’

‘‘कुठल्याही साहित्य चळवळीचा मुख्य उद्देश हा नवा लेखक घडवणे हा असतो. हे काम फलटणला निश्चितपणे झाले आहे. ग्रामीण साहित्याने साहित्यातील मानदंड मोडण्याचे, साहित्याचा एक नवा चेहरा निर्माण करण्याचे काम केले. त्यामुळे या चळवळी टिकून राहणे गरजेचे आहे. त्या टिकवण्यासाठी दिवाळी अंकांची गरज आहे’’, अशी अपेक्षाही किशोर बेडकिहाळ यांनी यावेळी व्यक्त केली.

दिलीपसिंह भोसले म्हणाले, ‘‘लोकजागर दिवाळी अंकाच्या माध्यमातून फलटण आणि परिसरातील लेखक, कवी यांना चांगले व्यासपीठ मिळत असते. दिवसेंदिवस हा अंक अधिक दर्जेदार होत गेला असून त्यामुळेच आपले सदैव पाठबळ या अंकाला दिले जाते.’’

सुरेश शिंदे म्हणाले, ‘‘लोकजागर दिवाळी अंकासाठी दिलेले प्रत्येक साहित्य आजवर प्रसिद्ध झालेले आहे. लेखकांच्याप्रती आत्मीयता जपण्याचे काम ‘लोकजागर’ कडून नेहमीच होत असते; हे कौतुकास्पद आहे.’’

म.सा.प. फलटण शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे म्हणाले, ‘‘लोकजागर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या माध्यमातून अनेक लेखक, कवी याठिकाणी घडले आहेत. प्रत्येक महिन्याला आम्ही ‘साहित्यसंवाद’ हा उपक्रम आयोजित करतो. या उपक्रमातून निकोप चर्चा, विचार व्यक्त होत आहेत. या उपक्रमाचे ‘मूळ’ ‘लोकजागर’च आहे.’’
म.सा.प. फलटण शाखा कार्यवाह ताराचंद्र आवळे म्हणाले, ‘‘लोकजागर दिवाळी अंकाशी आम्हा साहित्यिकांचा जुना ऋणानुबंध आहे. ग्रामीण साहित्यिकांना प्राधान्य दिले जात असल्याने आपल्या साहित्यकृतीचे प्रतिबिंब या अंकात निश्चितपणे पहायला मिळते.’’

लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश साळुंखे म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून राजकीय तणावांमुळे आजूबाजूचे वातावरण दूषित झाले आहे. हे वातावरण बदलून आपापसात प्रेम आणि सद्भाव निर्माण करण्यासाठी लायन्स क्लब उपक्रम राबवत आहे. ‘लोकजागर’ ने ही याबाबत लोकजागृती करावी.’’
आभारपर मनोगतात रविंद्र बेडकिहाळ यांनी, ‘‘‘उपरा’ पासून ‘सर्ज्या’ पर्यंत अशा नामवंत लेखकांना लिहीतं करण्याचं काम ‘लोकजागर’ ने केले. समाजामध्ये संवाद संपत चालला असून विसंवाद वाढत आहे. आज तरुणांना धर्माच्या नावाखाली रस्त्यावर आणले जात आहे. पण खरं तर या तरुणांना ‘धर्म’ महत्त्वाचा की ‘भाकरी’ हे पटवून दिले तर तरुणांना भवितव्य आहे. यासाठी साहित्यिक, पत्रकारांनी योग्य पेरणी करणे गरजेचे आहे’’, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘सत्याचा आसूड’ या कादंबरीला ‘कवी नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सुरेश शिंदे यांचा किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते तर कोषागार विभागातून सेवानिवृत्तीबद्दल लोकजागर परिवारातील सदस्य दिपक कुलकर्णी यांचा डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक म.सा.प.फलटण शाखा कार्यवाह अमर शेंडे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत ‘लोकजागर’ च्या व्यवस्थापकीय संपादिका सौ. अलका बेडकिहाळ व संपादक रोहित वाकडे यांनी केले.
कार्यक्रमास पत्रकार तथा लेखक विकास शिंदे, लायन्स आय हॉस्पीटलचे सचिव चंद्रकांत कदम, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप, अरुण खरात, सवेरा काँप्युटर्सचे मुनीर तांबोळी, सागर ऑफसेटचे सागर मोहिते आदींची उपस्थिती होती.

