आबांच्या पत्‍नीचा ‘राजे गटात’ मजबूत दावा; प्रभाग क्रमांक ८ मधून सौ. शितल निंबाळकर यांची उमेदवारीसाठी मागणी

। लोकजागर । फलटण । दि. 7 नोव्हेंबर 2025 ।

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर शहरात उमेदवारीसाठी चाचपणी सुरू झाली आहे. विविध प्रभागांतून इच्छुकांची गर्दी वाढत असताना, प्रभाग क्रमांक ८ (सर्वसाधारण महिला आरक्षित) या मतदारसंघातून राजे गटाकडून सौ. शितल धनंजय निंबाळकर यांची उमेदवारीसाठी जोरदार मागणी सुरू आहे. आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या मुलाखत कार्यक्रमात त्यांनी आपल्या उमेदवारीची मागणी अधिकृतरित्या केली आहे.

सौ. शितल निंबाळकर या श्री. धनंजय चंदरराव निंबाळकर (आबा) यांच्या सुविध्य पत्‍नी असून, आबा निंबाळकर हे स्थानिक पातळीवर सामाजिक, धार्मिक कार्यासाठी ओळखले जाणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचं नाव अनेक सामाजिक उपक्रमांशी जोडलेलं आहे, त्यामुळेच प्रभाग क्रमांक ८ मध्ये निंबाळकर कुटुंबाची मजबूत पकड असल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जातं.

या प्रभागात गेल्या काही दिवसांत घेतलेल्या बैठका, चर्चांमध्ये आणि सोशल मीडियावर सौ. शितल निंबाळकर यांच्या नावाची चर्चा वाढली आहे. “शितलताई शांत, प्रामाणिक आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणाऱ्या आहेत. प्रभागातील महिलांचे, वयोवृद्धांचे आणि व्यावसायिकांचे प्रश्न त्यांना माहीत आहेत. त्यामुळे त्या योग्य प्रतिनिधी ठरतील,” असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.

सौ. शितल निंबाळकर यांनी अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच संपर्क मोहिमेला प्रारंभ केला असून, नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आहेत. “राजकारण हे पदासाठी नसून सेवेसाठी असावं. प्रभाग क्रमांक ८ चा विकास आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणं हेच माझं ध्येय आहे,” असं त्यांनी बोलताना सांगितलं.

Spread the love