। लोकजागर । फलटण । दि. २५ नोव्हेंबर २०२५ ।
फलटण शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पक्षाच्या आदेशानुसार आपण फलटण शहरात उमेदवार उभे केले आहेत. सध्या आम्ही शून्यातून सुरुवात करत आहोत. निवडणुकीत मोठे-मोठे मातब्बर नेते एकमेकांविरोधात लढत आहेत; पण लोकांनी आता एकदा सामान्यांना संधी द्यावी. ते म्हणाले, आमच्या पक्षातून साध्या घरातली साधी माणसं निवडणुकीत उभी आहेत.
ते पुढे म्हणाले की, हा फलटण तालुका शरद पवारांवर प्रेम करणारा आहे. आमच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही, यातूनच त्यांचा ठामपणा दिसून येतो. ते म्हणाले, “दहशत फक्त फलटणमध्ये नाही, तर संपूर्ण देशात आहे. लोक घाबरतात, त्यातून दहशत निर्माण होते.” काही लोक सत्तेच्या अधिकाराचा उपयोग करून दहशत निर्माण करतात.
आ. शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, आम्ही राज्यात महाविकास आघाडी टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, साध्या-सामान्य उमेदवारांना संधी देऊन फलटणच्या विकासाला नवी दिशा द्यावी.
