मराठा शौर्याचा आणि साहित्याचा सुगंध! ९९व्या संमेलनाची स्मरणिका ‘अटकेपार’ ठरणार ऐतिहासिक दस्तावेज

। लोकजागर । सातारा । दि. २४ डिसेंबर २०२५ ।

साताऱ्यात होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित होणारी ‘अटकेपार’ ही स्मरणिका केवळ एक अंक नसून, तो सातारा जिल्ह्याचा गौरवशाली इतिहास आणि मराठी साहित्याचा प्रगल्भ वारसा सांगणारा एक सर्वस्पर्शी संग्राह्य दस्तावेज ठरणार आहे. या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन संमेलनाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा स्मरणिकेचे मुख्य संपादक विनोद कुलकर्णी यांनी दिली.


‘अटकेपार’ नावामागील पराक्रमी इतिहास

सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी आणि शौर्याची भूमी आहे. याच भूमीतून मराठ्यांनी अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत म्हणजेच ‘अटकेपार’ आपला झेंडा फडकवला होता. पराक्रमाच्या या ऐतिहासिक समीकरणाची आठवण म्हणून स्मरणिकेला ‘अटकेपार’ हे सार्थ नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्या वतीने होणाऱ्या या शतकपूर्व संमेलनासाठी ही स्मरणिका विशेष आकर्षण ठरेल.


५६ लेख आणि २७० पानांचा ज्ञानकोश

या स्मरणिकेची मांडणी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने तीन विभागांत करण्यात आली आहे. सुमारे २७० पृष्ठांच्या या स्मरणिकेत एकूण ५६ माहितीपूर्ण लेख समाविष्ट आहेत. यात सातारा जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास, संस्कृती, रंगभूमी, पत्रकारिता, खाद्यसंस्कृती, क्रीडा आणि कृषीव्यवस्था अशा विविध विषयांवर प्रज्ञावंतांनी भाष्य केले आहे. विशेष म्हणजे, स्मरणिकेच्या प्रत्येक पानावर सातारा, मराठी साहित्य आणि मराठी भाषा याविषयी वैशिष्ट्यपूर्ण तळटीपा (Footnotes) देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे वाचकांना एकाच ठिकाणी मोठी माहिती उपलब्ध होईल.


ज्वलंत विषयांवर नामवंत साहित्यिकांचे विचार

आजच्या बदलत्या काळात मराठी भाषेपुढील आव्हाने आणि संधी यावर नामवंत लेखकांनी आपले विचार मांडले आहेत. इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव आणि बालसाहित्याची स्थिती, तरुणांमधील वाचन संस्कृती, चित्रपट विषयक लेखन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि साहित्यिकांची सर्जनशीलता, तसेच विज्ञान लेखनाचे लोकशाहीकरण यांसारख्या ज्वलंत विषयांवरील परिसंवाद या स्मरणिकेचे महत्त्व अधिक वाढवतात.

या स्मरणिकेचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून मुकुंद फडके यांनी काम पाहिले आहे. मराठी भाषा, साहित्य आणि साताऱ्याची गौरवगाथा यांची सुंदर गुंफण असलेली ही स्मरणिका साताऱ्याच्या पराक्रमाप्रमाणेच साहित्याच्या क्षेत्रातही ‘अटकेपार’ पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Spread the love