फलटणमध्ये ‘श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन २०२५’ चा दिमाखदार सोहळा; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांच्या हस्ते आज होणार उद्घाटन

। लोकजागर । फलटण । दि. २५ डिसेंबर २०२५ ।

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने आयोजित ‘श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन – २०२५’ चा भव्य शुभारंभ आजपासून होत आहे. फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल (जिंती नाका) येथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

या कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आज गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता संपन्न होईल. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती व फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (चेअरमन, कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण व चेअरमन, फलटण एज्युकेशन सोसायटी), श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (माजी अध्यक्ष, सातारा जिल्हा परिषद व सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी), शरदराव रणवरे (व्हाईस चेअरमन, महाविद्यालयीन समिती), अरविंद निकम (प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे प्रदर्शन २५ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत चालणार असून, प्रदर्शनाचा समारोप सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता होईल. आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. तरी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी प्रदर्शन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love