‘संविधान दिन’ शब्दाची भव्य मानवी साखळी! यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान अमृत महोत्सव उत्साहात

। लोकजागर । फलटण । दि. ३१ डिसेंबर २०२५ ।

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आणि ‘घर घर संविधान’ अभियानांतर्गत (२६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६) फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. मंगळवार, दि. ३० डिसेंबर रोजी प्रशालेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी भव्य मानवी साखळीच्या माध्यमातून मैदानावर “संविधान दिन” हे शब्द साकारून भारतीय संविधानाचा गौरव केला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या प्राचार्या सौ. एन. एम. गायकवाड, उपप्राचार्य श्री. पी. डी. घनवट आणि पर्यवेक्षिका सौ. सी. आर. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले. संविधानातील मूल्ये आणि लोकशाहीचा सन्मान राखण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या भव्य मानवी साखळीमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व विभागांतील विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहाने सहभाग घेतला. मैदानावर मानवी साखळीतून साकारलेले “संविधान दिन” हे शब्द सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाबद्दल आदर आणि जाणीव जागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

‘घर घर संविधान’ अभियानाला बळ

२६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या महोत्सवाचा एक भाग म्हणून प्रशालेत विविध उपक्रम राबवले जात आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकशाहीचा हा जागर फलटण शहरात चर्चेचा विषय ठरला असून, शालेय स्तरावर अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत आहे.

Spread the love