कोळकीत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिकेचे दालन सज्ज; जयकुमार शिंदे यांची माहिती

। लोकजागर । फलटण (कोळकी) । दि. ३ जानेवारी २०२६ ।

फलटण शहरालगत असलेल्या कोळकी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष प्रयत्नांतून कोळकी व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका पूर्ण झाली आहे. या अभ्यासिका केंद्रामुळे UPSC, MPSC आणि इतर शासकीय परीक्षा देणाऱ्या मुला-मुलींच्या अभ्यासाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

या भव्य प्रकल्पाबाबत माहिती देताना भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शहरात जाऊन अभ्यास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या अभ्यासिकेसाठी पुढाकार घेतला. लवकरच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते या अभ्यासिकेचे दिमाखदार उद्घाटन होणार आहे.

वायफाय, सीसीटीव्हीसह ‘हायटेक’ सुविधा

केवळ बसण्यासाठी जागाच नव्हे, तर अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी या अभ्यासिकेत आधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना हाय-स्पीड वायफाय, संगणक सुविधा (Computer), शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कोळकी गावातील तरुण मित्र परिवाराने आणि गरजू विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गावातून अधिकारी घडवण्याचे स्वप्न

“या अभ्यासिकेच्या माध्यमातून कोळकी गावातून उत्तम सनदी अधिकारी तयार व्हावेत आणि भविष्यात त्यांनी गावाच्या व समाजाच्या विकासात आपले योगदान द्यावे, हेच आमचे मुख्य ध्येय आहे,” अशा भावना जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केल्या. या अभ्यासिका प्रकल्पामुळे कोळकीच्या शैक्षणिक वैभवात मोठी भर पडली असून, स्थानिक पालकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Spread the love