झेंडा कुणाचाही घ्या, दांडा मराठीचाच असायला हवा! ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी साताऱ्याच्या भूमीतून फुंकले मराठी अस्मितेचे रणशिंग

। लोकजागर । सातारा (स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी) । दि. ३ जानेवारी २०२६ ।

“मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही पक्षाचा वा धर्माचा असुदे, पण त्याचा दांडा हा मराठीच असायला हवा,” अशा शब्दांत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आक्रमक आणि आग्रही भूमिका मांडली. सातारा येथील ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी मराठी शाळा, ग्रंथालये आणि शेतकरी प्रश्नांवर प्रशासनाचे कान टोचले.

बळीराजासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ योजनेची मागणी

विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या व्यथांना केंद्रस्थानी ठेवले. “बळीराजाच्या आत्महत्या हे केवळ राजकीय पक्षांचे नव्हे, तर लेखक आणि कलावंतांचेही अपयश आहे,” अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर शेतात घाम गाळणाऱ्या कष्टकरी स्त्रियांसाठी शासनाने ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी यावेळी केली.

मराठी शाळांचे ‘घरचे मारेकरी’ कोण?

राज्यातील मराठी शाळांच्या दुरवस्थेवर भाष्य करताना त्यांनी प्रशासन आणि शासनावर कडाडून टीका केली. “गेल्या १३ वर्षांत एकही नवी मराठी शाळा सुरू झालेली नाही, उलट मुंबईत १०६ शाळा बंद करण्याचा पराक्रम आम्ही केला आहे. मराठी शाळांचे सक्षमीकरण होतेय की इंटरनॅशनल स्कूलवाल्यांचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वर्गखोलीत केवळ एक जरी विद्यार्थी असला तरी मराठी शाळा चालायलाच हवी, कारण तोच उद्याचा ज्ञानेश्वर किंवा तुकोबा असू शकतो, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रंथालये आणि पुस्तकांच्या दुकानांची वानवा

मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी ३६ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांच्या मुख्यालयात एकही दुकान नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व एसटी स्थानके आणि रेल्वे स्थानकांवर मराठी पुस्तकांसाठी सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. “ग्रंथालयीन कर्मचारी जे तुमच्या मनाची मशागत करतात, त्यांना योग्य वेतन मिळणे हा मायमराठीचा सन्मान आहे,” असेही ते म्हणाले.

वन्यप्राणी आणि सर्कस: एक नवा विचार

अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी ‘प्राणीमित्रां’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “बिबट्या आणि रानटी हत्तींसारखे प्राणी मोकाट सुटण्याऐवजी त्यांना सर्कशीमध्ये पुन्हा वापरायला परवानगी द्यावी. प्राणिमित्रांनी समाजाला वेठीस धरण्याचा आगाऊपणा करू नये,” असा वेगळा विचार त्यांनी मांडला.

मुंबईतून मराठी माणूस हद्दपार?

मुंबईच्या गिरणगावातील मूळ रहिवासी कोळी, आगरी आणि कुणबी गेले कुठे? असा सवाल करत त्यांनी मुंबईतील मराठी टक्क्याच्या घसरणीवर भाष्य केले. “संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी ५२ टक्के असलेला मराठी माणूस आज ३० टक्क्यांच्या खाली आला आहे. गिरगाव, दादर, पार्ला रिकामे होत असून पुनर्वसनाचा वरवंटा आमच्या छाताडावर फिरत आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सातारच्या मातीचा वारसा आणि शपथ

साताऱ्याच्या भूमीतील छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करत पाटील म्हणाले की, “माझ्या साहित्यिक कारकीर्दीला सातारच्या सकस मातीनेच घडवले आहे.” भाषणाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, “लवकरात लवकर जागे व्हा, अन्यथा कायमचे संपून जाल. साताऱ्याची ही पवित्र भूमी सोडताना माय मराठी वाचवण्याची आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या नाचवण्याची शपथ घेऊया!”

Spread the love