। लोकजागर । फलटण । दि. ३ जानेवारी २०२६ ।
“येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत. ही निवडणूक सत्ताधारी पक्षांसाठी त्यांच्या अस्तित्वाची लढाई असेल, परंतु आमचा पक्ष सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक लढवत आहे,” अशी रोखठोक भूमिका पक्षाचे नेते धर्मराज पाटील यांनी मांडली.
फलटण तालुक्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धर्मराज पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाची रणनीती आणि स्वतःच्या उमेदवारीबाबतही सूतोवाच केले.
गावभेट दौऱ्यातून जनतेशी संवाद
धर्मराज पाटील यांनी सांगितले की, “आम्ही तालुक्यात गावभेट दौरे सुरू केले असून, आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या जनतेशी आम्ही थेट संवाद साधत आहोत. जनतेचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, परिवर्तनासाठी लोक सज्ज झाले आहेत.”
शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य
“मला स्वतःला शेती क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची मला जाण असून त्यांच्या उन्नतीसाठी मी सातत्याने काम केले आहे. शेतीमालाला भाव, सिंचनाचे प्रश्न आणि ग्रामीण भागातील विकास या मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोळकी गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक
स्वतःच्या उमेदवारीबाबत बोलताना धर्मराज पाटील म्हणाले, “मी स्वतः कोळकी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. पक्षश्रेष्ठींनी आणि आदरणीय पवार साहेबांनी संधी दिल्यास, कोळकी गटासह संपूर्ण तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करून आम्ही ही निवडणूक मोठ्या ताकदीने जिंकू.”
धर्मराज पाटील यांच्या या भूमिकेमुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
