। लोकजागर । फलटण । दि. ११ जानेवारी २०२६ ।
लांब पल्ल्याच्या खाजगी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेहग्रस्त रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता, नवीन बसेसमध्ये ‘इन-बिल्ट बाथरूम’ (On-board Toilet) अनिवार्य करण्यात यावे, अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम सुधाकर जांभेकर यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
विक्रम जांभेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या दळणवळण वाढल्यामुळे नागरिक खाजगी बसेसचा (Sleeper/Seater) मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. मात्र, ५ ते ६ तास सलग प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः मधुमेहाचा त्रास असलेल्या प्रवाशांची मोठी कुचंबणा होते. अनेकदा चालक गाडी थांबवत नाहीत आणि थांबवली तरी तिथली स्वच्छतागृहे अतिशय घाणेरडी असतात, ज्याचा सर्वाधिक फटका महिला आणि वृद्धांना बसतो.
पत्रातील प्रमुख मागण्या:
- नवीन बसेससाठी नियम: इथून पुढे परवाना मिळणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या खाजगी बसेसमध्ये ‘इन-बिल्ट बाथरूम’ची सोय अनिवार्य करावी.
- थांब्यांची नियमावली: ज्या बसेसमध्ये ही सोय नाही, त्यांना दर २ ते ३ तासांनी किंवा दर १०० किमी अंतरावर स्वच्छ स्वच्छतागृह असलेल्या ठिकाणी थांबा घेणे बंधनकारक करावे.
- आरटीओ मार्फत तपासणी: बस ज्या ठिकाणी थांबते, त्या ठिकाणच्या सोयी-सुविधांची आरटीओ प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी व्हावी.
- आपत्कालीन थांबा: प्रवाशाने मागणी केल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवण्याचे निर्देश चालक-वाहकांना देण्यात यावेत.
- बस ले-बाय सुविधा: महामार्गावर अवजड वाहनांप्रमाणेच खाजगी बसेससाठीही सुरक्षित ‘ले-बाय’ आणि विश्रांतीची ठिकाणे विकसित करावीत.
‘नितीन गडकरींकडून मोठ्या अपेक्षा’
नितीन गडकरी हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारे नेते आहेत. त्यामुळे या गंभीर मानवी प्रश्नावर ते सकारात्मक तोडगा काढतील, असा विश्वास जांभेकर यांनी व्यक्त केला आहे. या पत्रामुळे आता खाजगी बस प्रवाशांच्या सुविधेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, मंत्रालय यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
