। लोकजागर । फलटण । दि. 4 नोव्हेंबर 2025 ।
‘‘फलटणला काल नाटकाचा एक अंक झाला. त्यामध्ये दुधाने अभिषेक आणि रडण्याचं नाटक झालं. त्यांचा तो अभिनय ‘ऑस्कर’ देण्यासारखा होता’’, अशी मिश्किल टिका सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन रोज नवीन राजकीय आरोप होत असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल दि. 3 रोजी फलटणच्या गजानन चौकात जाहीर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर होणार्या आरोपांमागे विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असल्याचा जाहीर आरोप रणजितसिंह यांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले, ‘‘महिला डॉक्टरांचे घडलेले प्रकरण दुर्दैवी आहे. त्यावरुन सुरु असलेले आरोप – प्रत्यारोपही दुर्दैवी आहेत. हे प्रकरण झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा रामराजेंनीच पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी केवळ सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सदर महिला डॉक्टरांचे काही लेखी खुलासे माध्यमांनी समोर आणले. त्यानंतर माजी खासदारांवर आरोप सुरु झाले. ते खुलासे पत्रकारांनी बाहेर काढले आणि ते आता रामराजेंना यासाठी जबाबदार धरत आहेत. त्यांनी या प्रकरणात रामराजेंना मास्टरमाईंड म्हणणे मुर्खपणाचे आहे.’’
‘‘दिगंगबर आगवणे त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांच्या व्यवहारात आमचा काहीही संबंध नाही. त्यांच्या कुटूंबांचा आक्रोश बाहेर येतोय त्यालाही ते रामराजेंनाच जबाबदार धरत आहेत. पण मग ज्यावेळी आगवणेंनी रामराजेंच्या विरोधात उपोषण केलं होतं त्यावेळी त्यांनी विष घेण्याचा प्रयत्न केला होता; त्यामागे कोणाचा मास्टरमाईंड होता?’’, असा सवालही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी उपस्थित केला.
‘‘कोणत्याही विरोधकाला आम्ही अशा पद्धतीने डॉमीनेट केलेले नाही. लोकांचा निर्णय स्वरुकारुन आम्ही पुढे जातो. कुणालाही अकारण बदनाम करण्याची आमची संस्कृती नाही. कुठं तरी विषयांतर करुन मी त्यातला नाही; असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या आत्महत्या प्रकरणातील सर्व प्रश्नांची चौकशी व्हावी एव्हढीच आमची अपेक्षा आहे. जर नार्को टेस्ट करायची असेल तर त्यांच्यावर आजवर झालेल्या सर्व आरोपांपासून व्हावी’’, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
