लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कुणालाच नाही; निरा नदी प्रदूषणावरून आमदार सचिन पाटील यांचा अधिकाऱ्यांना इशारा

सांगवी येथे नदी पात्राची प्रत्यक्ष पाहणी; प्रदूषित पाणी सोडणाऱ्या प्रकल्पांवर कडक कारवाईचे निर्देश

। लोकजागर । फलटण । दि. १३ जानेवारी २०२६ ।

सांगवी (ता. फलटण) येथील ग्रामस्थांनी निरा नदी पात्रातील दूषित पाण्याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेत आमदार सचिन पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी नदीच्या पात्रातील पाण्याची विदारक परिस्थिती पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. नदीत मिसळणारे दूषित पाणी आणि त्यामुळे होणारे जलप्रदूषण ही अत्यंत गंभीर बाब असून, यामुळे परिसरातील शेती आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे आमदारांनी यावेळी नमूद केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्यासह पदाधिकारी, सांगवी ग्रामस्थ उपस्थित होते.

ओढ्यांची तपासणी करा आणि लेखी अहवाल सादर करा

निरा नदीला येऊन मिळणाऱ्या प्रत्येक नैसर्गिक ओढ्याची सखोल तपासणी करण्याचे आदेश आमदार सचिन पाटील यांनी यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. “ज्या ओढ्यातून घाण पाणी नदीला येऊन मिळत आहे आणि ज्यामुळे नदी प्रदूषित होत आहे, अशा प्रवाहांचा शोध घ्या. या दूषित पाण्याचा शेती पिकांवर आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे जबाबदार घटकांवर तात्काळ कडक कारवाई करून त्याचा सविस्तर लेखी अहवाल मला सादर करा,” अशा कडक सूचना त्यांनी दिल्या.

प्रकल्प धारकांना फिल्टरेशन प्लांट बंधनकारक

“लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा थेट जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” अशा शब्दांत आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले. नदी पात्रात दूषित पाणी सोडणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाने किंवा कारखान्याने नियमानुसार फिल्टरेशन प्लांट (शुद्धीकरण प्रकल्प) बसवणे बंधनकारक आहे. सांडपाणी शुद्ध केल्याशिवाय ते ओढ्यात किंवा नदीत सोडता येणार नाही. जे प्रकल्प धारक या नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जर प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर तातडीने पावले उचलली नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवरच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

ग्रामस्थांकडून दुर्गंधीच्या त्रासाचा पाढा; अधिकाऱ्यांची ग्वाही

यावेळी उपस्थित सांगवी परिसरातील नागरिकांनी नदीकाठी पसरलेली दुर्गंधी आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा आमदारांसमोर मांडला. प्रदूषण निर्मूलन विभागाला याकामी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन नागरिकांनी दिले. तसेच या ज्वलंत प्रश्नात जातीने लक्ष घातल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार सचिन पाटील यांचे आभार मानले. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण परिसराची तांत्रिक पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Spread the love