फलटण तालुक्यात ‘मिनी मंत्रालया’वर वर्चस्व कोणाचे?

सर्वोच्च न्यायालयाच्या मुदतवाढीनंतर हालचालींना वेग; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू; रामराजे विरुद्ध रणजितसिंह यांच्यातील संघर्षाने तालुक्यात रंगणार राजकीय धुमश्चक्री

। लोकजागर । फलटण । रोहित वाकडे दि. १३ जानेवारी २०२६ ।

राज्यातील प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिल्याने फलटण तालुक्यात राजकीय हालचालींना उधाण आले आहे. फलटण तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होणार असून, पुढच्या २४ ते ७२ तासांत अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी आणि स्थानिक आघाड्यांनी आपापल्या बालेकिल्ल्यात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्षाने तालुक्यात राजकीय धुमश्चक्री रंगणार आहे.

गट आणि गणांच्या मोर्चेबांधणीत ‘काटे की टक्कर’

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या, प्रदीर्घ सत्तेच्या आणि विकासकामांच्या जोरावर तालुक्यातील ग्रामीण भागावर पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आणलेला निधी आणि ‘बदलाव’चा नारा देत श्रीमंत रामराजे यांच्या सत्तेला आव्हान देण्याचे काम केले आहे. या दोन दिग्गज नेत्यांच्या राजकीय ईर्ष्येमुळे फलटणचा प्रत्येक गट आणि गण आता रणांगण बनला आहे. कार्यकर्त्यांमध्येही ‘आपलाच नेता मोठा’ हे सिद्ध करण्यासाठी चढाओढ सुरू झाली असून, उमेदवारी मिळवण्यासाठी दोन्ही गटांकडे इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत.

सत्ता समीकरणांची नवी जुळवाजुळव

विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत रणजितसिंह यांना मिळालेल्या यशामुळे बदललेली राजकीय समीकरणे या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. श्रीमंत रामराजे आणि रणजितसिंह यांच्यातील हा संघर्ष केवळ सत्तेसाठी नसून, तो तालुक्यातील राजकीय अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. ८ गटांमधील आरक्षणाची गणिते आणि नवीन गण रचना यामुळे कोणाचे पारडे जड होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जनतेच्या कौलाकडे सर्वांचे लक्ष

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही थेट ग्रामीण जनतेशी निगडित असल्याने, इथल्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक कोण करणार, यावर मतदार आपली मोहोर उमटवतील. श्रीमंत रामराजेंचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव की रणजितसिंहांची आक्रमक कार्यशैली, यापैकी फलटणची जनता कोणाला पसंती देते, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. या राजकीय संघर्षाने फलटण तालुक्यात थंडीच्या दिवसांतही राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, सोशल मीडियापासून गावच्या पारापर्यंत केवळ याच संघर्षाची चर्चा रंगली आहे.

Spread the love