साखरवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारीची मागणी
। लोकजागर । फलटण । दि. १६ जानेवारी २०२६ ।
साखरवाडीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. गौरी संग्राम औचरे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमआप्पा भोसले या वरिष्ठ नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. “जर पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवून संधी दिली, तर सर्व सामान्य नागरिक, युवक आणि महिलांना सोबत घेऊन हा गट मोठ्या मताधिक्याने निवडून आणू,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखरवाडी (ता. फलटण) गटामध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, साखरवाडीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. गौरी संग्राम औचरे यांच्या नावाची उमेदवारीसाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुतीच्या माध्यमातून या गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
सौ. गौरी औचरे यांच्या समर्थकांनी सांगितले कि, “ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना सौ. औचरे यांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि जनतेशी असलेल्या थेट संवादामुळे परिसरात त्यांची एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. साखरवाडी जिल्हा परिषद गटात एका सुशिक्षित आणि तरुण महिला नेतृत्वाची गरज असून सौ. औचरे यांनी गावागावातील समस्या सोडवण्यासाठी दाखवलेली तत्परता पाहता, त्यांच्या पाठीशी नागरिकांचा मोठा पाठिंबा दिसून येत आहे.”
