येळेवाडी येथे २४ फेब्रुवारीला भरणार साहित्याचा जागर; ग्रामीण कथाकाराच्या निवडीने साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण
। लोकजागर । फलटण । दि. १७ फेब्रुवारी २०२६ ।
महाराष्ट्र देश न्यूज मराठीच्या वर्धापनदिनानिमित्त माण तालुक्यातील येळेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या १ल्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी दिवसभर चालणाऱ्या या भव्य दिव्य संमेलनात कथाकथन, कविसंमेलन आणि विविध क्षेत्रांतील कार्यकुशल मान्यवरांचा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. ग्रामीण साहित्याचा वसा आणि वारसा जपणाऱ्या प्रा. कोकरे यांच्या निवडीमुळे सातारा आणि माण-फलटण परिसरातील साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
प्रा. रवींद्र कोकरे हे गेल्या तीन दशकांपासून साहित्य क्षेत्रात सक्रिय असून, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण येथे मराठी आणि इतिहास विषयांचे प्रभावी अध्यापन करत आहेत. अध्यापन क्षेत्रातील त्यांच्या उज्वल निकालाची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या वृत्तीमुळे त्यांना आदर्श शिक्षक म्हणून नावलौकिक मिळाला आहे. त्यांचे ‘छबिना’, ‘थापणूक’, ‘बंड’ आणि ‘इजाळ’ हे कथासंग्रह तसेच ‘वैखरीचा जागर’ हे ललित गद्य प्रकाशित असून त्यांच्या साहित्यकृतींना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्ली यांसारख्या राज्यांत त्यांनी कथाकथन, प्रवचन आणि व्याख्यानांच्या हजारो कार्यक्रमांतून जनजागृतीचे मोठे कार्य केले आहे.
केवळ साहित्यच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही प्रा. कोकरे सरांनी आपल्या कृतीतून आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसानिमित्त केक कापण्याऐवजी वृक्षरोपण, ग्रंथवाटप करणे आणि शेतातच अस्थी विसर्जन करून स्मृतीवृक्ष लावण्याची नवी मोहीम त्यांनी सुरू केली आहे. विधवा महिलांचा सन्मान, वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी वस्ती तिथे वाचनालय आणि व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाबळेश्वर, चंद्रपूर, घुमान (पंजाब), दिल्ली आणि सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कथाकार म्हणून त्यांनी आपल्या बहारदार शैलीने रसिकांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्याध्यक्ष आणि वारकरी संघटनेचे कार्यवाह अशा विविध पदांच्या माध्यमातून त्यांचे शैक्षणिक आणि आध्यात्मिक योगदानही मोठे आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
