पांढरा कुर्ता, लाडक्या बहिणींचे गुलाबी जॅकेट आणि वेळेचे भान देणारे घड्याळ; दादांच्या वस्तू ठरतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा
। लोकजागर । फलटण । दि. १७ फेब्रुवारी २०२६ ।
महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आपल्यातून जाणे हे सर्वांसाठीच न पचणारे कटू सत्य असून, त्यांच्या आठवणी आणि कार्याचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी बारामतीमध्ये त्यांच्या विविध वस्तूंचे एक भव्य संग्रहालय (म्युझियम) उभारण्यात यावे, अशी भावनिक अपेक्षा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अतुल शहा यांनी व्यक्त केली आहे. अजितदादांची कार्यपद्धती, त्यांची शिस्त आणि लोकांप्रति असलेली निष्ठा या संग्रहालयाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला आणि कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देत राहील, असे मत शहा यांनी यावेळी मांडले.
अजितदादांच्या पेहरावाबद्दल बोलताना अतुल शहा यांनी त्यांच्या प्रत्येक वस्तूमागील लोकहिताचा अर्थ उलगडून दाखवला. दादा नेहमी पांढरा सलवार-कुर्ता घालत आणि त्यांच्या फुल शर्टाच्या बाह्या नेहमी दुमडलेल्या असायच्या, कारण ते कायम कामासाठी ‘बाह्या सारून’ जनतेच्या मैदानात उतरायचे. त्यांच्या पायातील चपलांचा पॅटर्न कधीच बदलला नाही, कारण त्याच जोडयांनी त्यांनी गोरगरिबांच्या कामासाठी लाखो मैल प्रवास केला. त्यांचा गॉगल हा देखाव्यासाठी नसून उन्हातानात लोकांची कामे करताना डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी होता. विशेषतः त्यांचे वेळेचे भान जगजाहीर होते; स्वतःचे घड्याळ नेहमी १५ मिनिटे पुढे लावून वेळेची पक्की शिस्त पाळणारे दादा कामात कधीही हलगर्जीपणा सहन करत नसत, या आठवणींना शहा यांनी उजाळा दिला.
राज्याच्या अर्थसंकल्पापासून ते सामान्य माणसाच्या अर्जापर्यंत ज्या पेनाने त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या, ते पेन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणलेली ‘लाडकी बहीण योजना’ ज्या गुलाबी जॅकेटमुळे ओळखली गेली, त्या जॅकेटला संग्रहालयात विशेष स्थान मिळावे, असे शहा म्हणाले. दादांनी अर्थसंकल्पावेळी परिधान केलेली सफारी, विविध कार्यक्रमांत मिळालेल्या पुणेरी पगड्या आणि चिरंजीव जय पवार यांच्या लग्नातील त्यांचा पारंपारिक पेहराव, या सर्व गोष्टी दादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दर्शवतात. हे संग्रहालय केवळ वस्तूंचे प्रदर्शन नसून ती महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या एका महान नेत्याची जिवंत गाथा ठरेल, असा विश्वास अतुल शहा यांनी व्यक्त केला आहे.
