लोणंद ते बरड मार्गाची ‘ड्रोन’ द्वारे तपासणी होणार; कामांसाठी तात्काळ निधी मागवण्याच्या सूचना
। लोकजागर । सातारा/फलटण । मंगळवार, दि. १० मार्च २०२६ ।
आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी फलटण शहरासह संपूर्ण पालखी मार्गावरील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी तात्काळ करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी फलटण शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले. शहरात सध्या अनेक अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत, मात्र पालखी सोहळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण होणे कठीण असल्याने त्यांनी महत्त्वाचा पर्याय सुचवला आहे. ज्या मार्गावरून माउलींची पालखी फलटण शहरात प्रवेश करते आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाते, त्या विशिष्ट रस्त्यांची कामे प्राधान्याने पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. यामुळे पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री प्रशासनाला करावी लागणार आहे.
यासोबतच पालखी सोहळ्यापूर्वी लोणंद ते बरड या मार्गावरील रस्त्यांची सद्यस्थिती तपासण्यासाठी चक्क ‘ड्रोन शूटिंग’ करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी महामार्ग खराब असेल तिथे तातडीने दुरुस्ती केली जाईल. लोणंद येथील पालखी तळावरील विद्युत डी.पी. हलवणे, निरा-लोणंद मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकाच बाजूला स्टॉल्स लावणे आणि निरा नदीवर पादुका स्नानाच्या ठिकाणची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या बैठकीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
