फलटणमध्ये दहशत माजवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांचा कडक इशारा; ‘विनाकारण त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही’

। लोकजागर । फलटण । मंगळवार, दि. १० मार्च २०२६ ।

फलटण शहरात वेगाने आणि मोठ्या आवाजात दुचाकी चालवणाऱ्या तरुणांना समज देणे एका गॅरेज व्यावसायिकाला महागात पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “गाड्या हळू चालवा” असे सांगितल्याच्या रागातून काही तरुणांनी गॅरेज व्यावसायिक व त्यांच्या भावावर सतुराने आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती.

या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी धडक कारवाई करत ४ मुख्य आरोपींना अटक केली असून ३ अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्त) मुलांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर शहरात दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तींना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणगल्ली येथील गॅरेज व्यावसायिक अनिल हिरणवाळे हे २२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गॅरेज बंद करून बाहेर उभे होते. त्यावेळी काही तरुण मोटरसायकलचा मोठा आवाज करत आणि अतिवेगाने गाड्या चालवत त्या भागातून जात होते.

यावेळी “अशा वेगात गाड्या चालवू नका, कोणाला तरी अपघात होईल,” असे त्यांनी त्या तरुणांना समजावले. मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून काही वेळातच त्या तरुणांनी परत येत अनिल हिरणवाळे आणि त्यांचे भाऊ संतोष हिरणवाळे यांच्यावर हाताने, लाकडी दांडक्याने आणि सतुराने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८/२०२६ दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत टप्प्याटप्प्याने आरोपींना अटक केली.

  • २४ फेब्रुवारी: दोन आरोपींना अटक
  • ६ मार्च: आणखी एक आरोपी ताब्यात
  • ९ मार्च: मुख्य आरोपींपैकी आणखी एकाला अटक

न्यायालयाने आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • ३ अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी

या हल्ल्यात सहभागी असलेल्या ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना सातारा येथील बाल न्यायमंडळासमोर हजर केले असता न्यायालयाने २३ मार्चपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करत आहेत.

या घटनेबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “फलटण शहरातील नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्य लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या कोणालाही पोलिसांकडून माफी नाही. अशा प्रवृत्तीवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल.”

Spread the love