। लोकजागर । मुंबई/फलटण । मंगळवार, दि. १० मार्च २०२६ ।
सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी बदनामी आणि विशेषतः महिलांच्या सायबर छळवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार आता आक्रमक झाले आहे. माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात केली.
विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील सायबर सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते.
कायद्यात होणार ठोस बदल: मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील काही तरतुदींबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत. त्या निर्णयांचा आदर राखून, सध्याच्या बदलत्या काळात गुन्हेगारांवर कडक वचक बसवण्यासाठी कायद्यात कोणते बदल करता येतील, याचा ही समिती सखोल अभ्यास करेल. “समाजातील सर्वच स्तरांतील लोकांना सायबर गुन्ह्यांचा फटका बसत आहे, मात्र महिलांची होणारी बदनामी ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी कायद्यात ठोस तरतुदी सुचवण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे सोशल मीडियावर अफवा पसरवणारे, चारित्र्यहनन करणारे आणि सायबर बुलींग करणाऱ्या समाजकंटकांना आता चाप बसणार आहे.
