। लोकजागर । फलटण । दि. 4 नोव्हेंबर 2025 ।
‘‘प्रत्येकवेळी त्यांच्यावर आरोप लागले की ते माझं नाव घेतात. अशा भानगडी तुम्ही करताच कशाला?’’असा सवाल उपस्थित करत ‘‘मला मास्टरमाईंड म्हणताय ते पुराव्यानिशी सिद्ध करा’’, असे प्रतिआव्हान महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन रोज नवीन राजकीय आरोप होत असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल दि. 3 रोजी फलटणच्या गजानन चौकात जाहीर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर होणार्या आरोपांमागे विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असल्याचा जाहीर आरोप रणजितसिंह यांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
‘‘पिडीत महिला डॉक्टरांनी दिलेल्या खुलाशातील आरोपांची तत्कालीन पोलीस अधिकार्यांनी योग्य दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टळली असती. या घटनेमुळे त्या लोकांनी तालुक्यात जी हिटलरची छळछावणी तयार करुन ठेवली होती; त्याविरोधात लोक बोलू लागले. राज्य पातळीवर याची दखल घेतली गेली. पोलीसांनी त्या तक्रारीतील कोण खासदार आहेत? ते कोण पी.ए. आहेत? याची तरी तपासणी केली आहे कां?’’, असा सवाहलही यावेळी आ. श्रीमंत रामराजे यांनी उपस्थित केला.
