फलटण नगरपरिषदेची आज विशेष सर्वसाधारण सभा; नामांतराचा कळीचा मुद्दा गाजण्याची शक्यता

लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत आगामी वर्षाचे अंदाजपत्रक आणि इमारत नामांतराचा कळीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

। लोकजागर । फलटण । २५ मार्च २०२६ ।

फलटण नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आज बुधवार, २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही सभा तब्बल ४६ विषयांच्या विस्तृत अजेंड्यावर होणार असून, यामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वाक्षरीने या सभेचा अजेंडा प्रसिद्ध करण्यात आला असून, यामध्ये प्रामुख्याने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा आणि विविध विकासकामांना मंजुरी दिली जाणार आहे. विशेषतः नगरपरिषद सभागृह आणि इमारतीच्या नामांतराचा विषय या सभेत कळीचा ठरणार आहे, कारण विरोधी असलेल्या राजे गटाने या नामांतराला आधीच तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

या सभेमध्ये शहरातील मूलभूत सुविधा जसे की रस्ते, नाले, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्यान विकास आणि आरोग्य सुविधांशी संबंधित विषयांवर प्रामुख्याने मंथन होईल. तसेच शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देणे आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवर कठोर कारवाई करण्याबाबतही ठोस निर्णय घेतले जाणार आहेत.

याव्यतिरिक्त आधुनिक उपक्रमांवर भर देत शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, पार्किंगची सुयोग्य व्यवस्था करणे आणि नगरपरिषद कार्यालयातील तांत्रिक सुविधांमध्ये सुधारणा करणे अशा नावीन्यपूर्ण विषयांचाही समावेश अजेंड्यात करण्यात आला आहे. फलटण शहराच्या आगामी काळातील विकासाची दिशा ठरवणारी ही सभा असल्याने सर्व नगरसेवक, अधिकारी आणि संबंधित विभागांना सभेला उपस्थित राहून विषयांवर सखोल चर्चा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या सभेत होणारे निर्णय फलटणकरांच्या हिताच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत.

Spread the love