माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमीचे सुशोभीकरण आणि स्वच्छता केली जाणार असून नगरपरिषदेच्या सभेत पाच वर्षांच्या कराराला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
। लोकजागर । फलटण । २५ मार्च २०२६ ।
फलटण शहरातील वैकुंठ स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा प्रश्न आता कायमचा निकाली लागणार आहे. श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या ‘महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ने या स्मशानभूमीच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. यासंदर्भातील प्रस्ताव नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला असता, त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मिळून सर्वानुमते मंजुरी दिली आहे. यामुळे दिलीपसिंह भोसले यांच्या संकल्पनेतून आता स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न होणार आहे.
या निर्णयानुसार, महाराजा मल्टीस्टेटच्या पुढाकारातून स्मशानभूमीची नियमित स्वच्छता, झाडलोट आणि पाणी मारून परिसर निर्जंतुक ठेवण्याची जबाबदारी घेतली जाणार आहे. स्मशानभूमीच्या परिसरात शोभिवंत फुलांची झाडे आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले जाईल. विशेष म्हणजे, येथील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी स्मशानभूमीपूरक संगीत आणि भजनांची व्यवस्था केली जाणार आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, योग्य ठिकाणी विद्युतीकरण आणि एक पूर्णवेळ सेवक या सेवाही पुरवल्या जाणार आहेत. तसेच, संस्थेच्या वतीने एक आदर्श आणि सुसज्ज शववाहिकेची व्यवस्था करण्यात येणार असून अंत्यसंस्कार, सावडणे आणि दशक्रिया विधीसाठी आवश्यक ते नियोजन केले जाणार आहे.
नगरपरिषद आणि महाराजा उद्योग समूह यांच्यात या कामासाठी पाच वर्षांचा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या विषयावरील चर्चेत राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक पंकज पवार, भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सुदामराव मांढरे आणि उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी सहभाग घेऊन या उपक्रमाचे स्वागत केले. खासगी लोकसहभागातून सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण करण्याचा हा एक आदर्श प्रयोग फलटण शहरात राबवला जात असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
