नगरपरिषद इमारत, सभागृहे आणि उपनगरांच्या नामकरणाचा विषय बहुमताने मार्गी; शिवसेनेच्या उपसूचनेवरून सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
। लोकजागर । फलटण । २५ मार्च २०२६ ।
फलटण नगरपरिषदेच्या आज संपन्न झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी संबंधित ४६ विषयांवर चर्चा झाली. मात्र, अजेंड्यावरील विषय क्रमांक ९ असलेल्या शहरातील मुख्य रस्ते, पालिकेच्या इमारती आणि सभागृहांच्या नामांतराचा मुद्दा अत्यंत वादळी ठरला. या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. अखेर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी महापुरुषांची नावे पुढील पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे नमूद करत हा ठराव बहुमताने मंजूर केला.
मंजूर झालेल्या ठरावानुसार, नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे ‘महाराजा मलोजीराव नाईक निंबाळकर भवन’ हे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज भवन’ करण्यात येणार आहे. तसेच इमारतीतील ‘श्री. रामराजे नाईक निंबाळकर सभागृहा’चे नाव ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृह’ आणि ‘श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृहा’चे नाव बदलून ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह’ असे करण्यात आले आहे. याशिवाय श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटरला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शॉपिंग सेंटर’ आणि जुन्या नगरपरिषद इमारतीस ‘छत्रपती सईबाई महाराणी भवन’ अशी नावे देण्यात आली आहेत. शहरातील बारामती चौकास ‘माता रमाई चौक’, रिंगरोड परिसरास ‘छत्रपती संभाजी राजे नगर’, तर सोमवार पेठेतील फिरंगाई देवी मंदिर परिसरास ‘फिरंगाई देवी नगर’ अशी नवी ओळख मिळणार आहे.
या विषयावर शिवसेनेच्या नगरसेविका कु. श्वेता किशोर तारळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत हरकत नोंदवली. त्यांनी उपसूचना मांडताना स्पष्ट केले की, जी नावे नव्याने दिली जात आहेत त्यांना आमचा विरोध नाही, मात्र यापूर्वीच सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेले आणि अंमलबजावणी झालेले ठराव बदलणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. लोकभावनेचा आदर करून जुनी नावे बदलू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. शिवसेनेच्या वतीने विकास काकडे आणि पप्पू शेख यांनी या उपसूचनेचे जोरदार समर्थन केले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन अहिवळे यांनी महापुरुषांच्या नावांसाठी ठरावाच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, बहुमताच्या जोरावर हा ऐतिहासिक नामांतराचा ठराव अखेर मंजूर करण्यात आला.
