राज्यातील ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोकाकुल वातावरणामुळे नगराध्यक्षांचा निर्णय; माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिली माहिती.
। लोकजागर । फलटण । २५ मार्च २०२६ ।
फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला आगामी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय वर्तुळातील ज्येष्ठ नेतृत्त्व अजितदादा पवार यांच्या अकस्मात निधनामुळे निर्माण झालेल्या दुःखद आणि शोकाकुल पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतची अधिकृत माहिती फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस येत्या 27 मार्च रोजी आहे. दरवर्षी शहरात त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. विशेषतः नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी शहरात विविध उपक्रम आणि मोठ्या सोहळ्याचे नियोजन केले होते. मात्र, अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्यावर पसरलेल्या शोककळेमुळे आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही स्वरूपाचा उत्सव साजरा न करण्याचे ठरवले आहे. या कठीण प्रसंगी साधेपणाने राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे, असेही अनुप शहा यांनी सांगितले.
माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केलेल्या आवाहनानुसार, येत्या 27 मार्च रोजी कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी आणि नागरिकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही मोठे कार्यक्रम आयोजित करू नयेत. तसेच हार-तुरे, पुष्पगुच्छ किंवा कोणत्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन टाळावे. कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा आदर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
