राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल फलटण येथे जाहीर नागरी सत्कार संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. १२ मार्च २०२५ ।
‘‘नागरिकांशी आमचा सतत संवाद झाला पाहिजे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना वेळोवेळी आमच्याकडून मदत झाली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न सुरु असतो. मला मिळालेल्या पदकावर जरी माझे नाव असले तरी ते फक्त माझे नसून आजवरच्या पोलीस दलातील सेवेत सोबत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांचा तो सन्मान आहे. त्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी पोलीस दलात वैशिष्ठ्यपूर्ण सेवा देऊ शकलो’’, असे प्रतिपादन कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केले.

सुनिल फुलारी यांना केंद्र सरकारच्या वतीने उत्कृष्ठ प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सजाई गार्डन येथे फलटण उपविभागीय पोलीस कार्यालयाच्यावतीने सुनिल फुलारी यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख म्हणाले, ‘‘पोलीस खात्यात फार कमी लोकांना हा राष्ट्रपती पदकाचा मान मिळाला आहे. संजय फुलारी यांना त्यांच्या काकिर्दीत दुसर्यांदा हे पदक मिळाले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामात असलेला सातत्यपणा ओळखून शासनाने त्यांचा हा सन्मान केलेला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे कोल्हापूर परीक्षेत्रातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्यांच्यात आत्मविश्वात वाढला आहे.
अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर म्हणाल्या, ‘‘राजेंद्र फुलारी यांनी प्रत्येक ठिकाणी आपली उत्तम सेवा बजावली आहे. त्यांनी आपले कर्तव्य बजावताना नागरिक म्हणून बजावलेल्या जबाबदारीची दखल आजवर अनेकांनी घेतलेली आहे’’, असे सांगून फुलारी यांच्या आजवरच्या सेवेचा थोडक्यात आढावा सांगितला.
कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांसह पोलीस पाटील, फलटण उपविभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.