सकल जैन समाज लोणंदच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन; रक्तदान शिबिर, पालखी शोभायात्रा आणि महाप्रसादाने रंगणार सोहळा.
। लोकजागर । लोणंद । २९ मार्च २०२६ ।
लोणंद (ता. खंडाळा) येथील श्री १००८ महावीर दिगंबर जैन मंदिर येथे सोमवार, दिनांक ३० मार्च २०२६ रोजी भगवान महावीर जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. श्री चिन्मया श्री माताजी (ब्र. डॉली दीदी) यांच्या पावन सानिध्यात होणाऱ्या या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे फलटणच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आणि माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या कन्या कु. सिद्धाली अनुप शहा यांचा होणारा विशेष सत्कार. वयाच्या १८ व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवडून येऊन त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सकल जैन समाज लोणंदच्या वतीने सायंकाळी ६ ते ७ या वेळेत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात कु. सिद्धाली शहा यांच्यासोबतच लोणंदकरांच्या सेवेत रुजू झालेले नूतन डॉक्टर्स – डॉ. साहिल (नातू डॉ. आर. पी. गांधी), डॉ. सागर (नातू डॉ. अभय वर्धमाने) आणि डॉ. पल्लवी सागर वर्धमाने यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी ७ वाजता भक्ती भरत शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, त्यानंतर सकाळी ७:३० वाजता श्री अभिषेक आणि ८ ते ९ या वेळेत श्री चिन्मया श्री माताजींच्या उपस्थितीत भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत साई हॉस्पिटल (नीरा रोड) येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ११ वाजता महावीर मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, याचे दाते पूजा कलेक्शनचे श्री महावीर नेमचंद शहा हे आहेत. सायंकाळी ५ वाजता कोमल समीर शहा यांच्या वतीने अल्पोपहार दिला जाईल.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री आदिनाथ मंदिरचे अध्यक्ष राजकुमार व्होरा, श्री महावीर मंदिरचे अध्यक्ष अशोक शेठ शहा आणि सकल जैन समाज लोणंद परिश्रम घेत आहेत. या सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना जैन धर्मीयांसह सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
