नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; १ ते २२ एप्रिल दरम्यान हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे मिळणार ऑनलाईन धडे.
। लोकजागर । फलटण । ०१ एप्रिल २०२६ ।
हवामानातील वाढती अनिश्चितता आणि वाढता उत्पादन खर्च यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित करण्यात येत आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत चार विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आधुनिक शेतीशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. या मोहिमेत राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी विभागातील तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत.
या डिजिटल शेतीशाळेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, सर्व सत्रे संबंधित तारखांना सायंकाळी ७:३० वाजता सुरू होतील. १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे आणि बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन होईल. ८ एप्रिल रोजी बीजामृत, जीवामृत आणि दशपर्णी अर्क यांसारख्या जैविक निविष्ठा उत्पादनावर प्रकाश टाकला जाईल. १५ एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि २२ एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र व यांत्रिकीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या सर्व शेतीशाळांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेदच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे.
पारंपरिक कोरडवाहू शेती समोरील संकटावर मात करण्यासाठी ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ राबविले जात असून, शेतीचा खर्च कमी करून प्रतिकूल परिस्थितीतही उत्पन्नाची हमी देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या अभियानात कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम आणि पशुसंवर्धन विभाग यांसारख्या यंत्रणाही सहभागी झाल्या आहेत. शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि वनपट्टेधारक यांनी या डिजिटल व्यासपीठाचा उपयोग करून आपल्या शेतीमध्ये आधुनिकतेची जोड द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
