उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
। लोकजागर । फलटण । दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ।
”सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटणचा काही भाग उजाड आहे. अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारावेत. त्यामुळे वीज बिलात मोठी कपात होईल’’, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२५ – २६ चा पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठीची राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे (दि. ७ रोजी) झाली. त्यावेळी सातारा जिल्ह्याचा आढावा घेताना ना.अजित पवार बोलत होते. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या संकल्पना त्यांनी जाणून घेतल्या. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथे बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मानिनी हा स्वतंत्र व प्रशस्त मॉल उभारण्यात येत आहे, या संकल्पनेचे ना.अजित पवार यांनी कौतुक करुन अन्यत्रही ही संकल्पना राबवावी असे सांगितले.
सातारा जिल्ह्यात 2025-26 मध्ये प्रस्तावित करण्यात येत असलेल्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांची ना.अजित पवार यांनी माहिती घेतली. यामध्ये कृषी पर्यटनामध्ये थीम आधारित गावे विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासह निर्यातक्षम फळबाग उत्पादन प्रकल्प, नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत शेतकर्यांच्या गाई व म्हशींना लिंग विनिश्चित वीर्यमात्रा उपलब्ध करून देणे, डे केअर केमोथेरपी युनिट, महिला केंद्रित कर्करोग अभियान आदी उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माहिती दिली.