। लोकजागर । फलटण । दि. 5 नोव्हेंबर 2025 ।
संपूर्ण देशभर गाजत असलेल्या फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालय सातारा यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, गोपाळ बदने याने पोलीस दलाचे पूर्ण ज्ञान असताना बेफिकिरीने पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणुक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदास अशोभनिय ठरेल असे कृत्य करुन कर्तव्य पालनात व दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले आहे. त्यामुळे त्याला शासकीय सेवेत यापुढे ठेवणे उचित होणार होणार नाही म्हणून भारतीय राज्यघटना 1950 मधील अनुच्छेद 311 (2) (ब) अन्वये दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजीपासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी त्याला शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.
