। लोकजागर । फलटण । दि. ७ ऑगस्ट २०२५।
फलटण शहरालगत असलेल्या कोळकी गावात वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वीज ग्राहकांना वाढीव बिलाचा भुर्दंड सोसावा लागत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ६ ऑगस्ट रोजी फलटणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. जर स्मार्ट मीटरची सक्ती थांबवली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती आधीच खालावली आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या वाढीव बिलांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा भाजपाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोळकीतील ग्रामस्थांनी भाजपा पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत वाढीव वीज बिलांमुळे ग्राहकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली.

या निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीच्या फलटण येथील कार्यकारी अभियंत्यांना तातडीने उपाययोजना करून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम थांबवावे आणि ग्राहकांना योग्य वीज बिल आकारले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, वीज वितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जयकुमार शिंदे यांनी दिला आहे.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, कामगार नेते पै. बाळासाहेब काशिद, पै. संजय देशमुख, संदीप नेवसे, उदयसिंह निंबाळकर, किरण जाधव, रणजीत जाधव, प्रदिप भरते, देविदास जाधव, यशवंत जाधव, ज्योतिराम दंडिले आणि कोळकी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.