। लोकजागर । फलटण । दि. 24 सप्टेंबर 2025 ।
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने मौजे आरडगाव येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे पंधरावे पुष्प संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी पूज्य भंते भदंत काश्यप उपस्थित होते.

समता सैनिक दलाचे केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले यांनी “समता सैनिक दल महार बटालियन” या विषयावर मार्गदर्शन केले. महासभेचे तालुका अध्यक्ष महावीर भालेराव यांनी “चला बुद्ध विहारी” या संकल्पनेतून गीत सादर करून उपस्थितांचे मन रमवले. महासचिव आयुष्यमान बाबासाहेब जगताप यांनी वर्षावासाचे महत्त्व अधोरेखित करताना भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेला सुरुवात करून अश्विन पौर्णिमेला समाप्ती का केली याविषयी सविस्तर विवेचन केले.

मार्गदर्शक आयुष्यमान सोमीनाथ घोरपडे यांनी जनगणनेविषयी माहिती देऊन पाली भाषेला पारिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी केली. सातारा जिल्हा प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयुष्यमान दत्तात्रय खरात यांनी श्रामनेर शिबिरांची निर्मिती विहारातून व्हावी, असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद काकडे, गौतम काकडे, प्रकाश कदम, बाळू काकडे, गणेश कदम, संतोष काकडे, कीर्ती कुमार काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भीम गौरव तरुण मंडळ व माता रमाई महिला मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, आयआरएस अधिकारी आयुष्यमान तुषार मोहिते यांनी “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ प्रत्येक विहाराला भेट म्हणून देण्याचा उपक्रम राबवला असून, प्रत्येक विहारात धम्मग्रंथ वाचनाची प्रेरणा रुजवणे हा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय महासभेच्या वतीने संविधानाची उद्देशिका व सूत्रपटन यांची पुस्तिका उपस्थितांना वाटण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष आयुष्यमान विठ्ठल निकाळजे यांनी केले. यावेळी संस्कार सचिव आयुष्यमान बजरंग गायकवाड, कार्यालयीन सचिव आयुष्यमान चंद्रकांत मोहिते, संघटक आयुष्यमान आनंद जगताप, पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयुष्यमान रामचंद्र मोरे, बौद्ध उपासक सागर काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या प्रवचन मालिकेतून धम्मविचारांचा प्रसार होऊन “फलटण तालुक्यातील प्रत्येक घरात बौद्ध धम्म पोहोचावा” ही महासभेची भूमिका अधोरेखित झाली.
