लोकजागर • फलटण • दि. 1 डिसेंबर 2025
सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर वगळता इतर सात नगरपरिषदांसह एक नगरपंचायतीसाठी उद्या, दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, या मतदानाची मतमोजणी बुधवार, दि. 3 डिसेंबर रोजीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फलटण आणि महाबळेश्वर येथे दि. 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानावर उद्याच्या निकालाचा परिणाम होऊ नये म्हणून हा निकाल राखून ठेवावा, अशी मागणी आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली होती. मात्र प्रशासनाने या मागणीचा विचार केलेला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता 3 रोजी जाहीर होणार्या निकालाचा परिणाम फलटण, महाबळेश्वरमध्ये दिसून येणार कां? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, मलकापूर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर आणि वाई या सात नगरपरिषदा तसेच मेढा नगरपंचायत — अशा एकूण आठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील या आठ स्थानिक संस्थांमध्ये एकूण 374 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, शिपाई, पोलीस कर्मचारी अशा मिळून 2,352 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 54 झोनल अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत.
सातारा नगरपरिषदेकडून महिलांसाठी व दिव्यांगांसाठी एक विशेष मतदान केंद्र, बांबू संकल्पनेवर आधारित दोन मतदान केंद्रे आणि भारतीय सैन्य दलाच्या संकल्पनेवर एक विशेष मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. वाई नगरपरिषदेकडून महिलांसाठी व दिव्यांगांसाठी एक विशेष केंद्र तर म्हसवड नगरपरिषदेकडून महिलांसाठी एक विशेष मतदान केंद्र तयार केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार या सर्व आठ नगरपरिषद व नगरपंचायतींची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 नंतर सुरू राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवार, राजकीय पक्ष किंवा प्रसारमाध्यमांकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीतील आपला हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.
