| लोकजागर | फलटण | दिनांक ४ डिसेंबर २०२५ |
महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन, फलटण या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरवलेला आठवडा बाजार, कला, विज्ञान प्रदर्शन आणि फूड फेस्टिवल चांगलाच गाजला. “भाजी घ्या भाजी… ताजी ताजी भाजी,” “दहा रुपयांना मेथी, कोथिंबीर,” अन “गरमा गरम वडापाव” अशा आरोळ्यांनी हा बाजार अक्षरशः गजबजून गेला. या अनोख्या मंडईत मुलांच्या आर्थिक व्यवहाराची चांगली उलाढाल झाली. विविध पालेभाज्या, फळे, खाद्यपदार्थ आणि कला-विज्ञान स्टॉल्सला उपस्थित अतिथी, संस्था पदाधिकारी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या नाणी-नोटा, खरेदी-विक्री, नफा-तोटा आदी संकल्पना स्पष्ट झाल्या. तसेच जीवन व्यवहार, संवाद, सहयोग, आत्मविश्वास, चिकित्सक आणि सर्जनशील विचार यांसारख्या जीवन कौशल्यांची मुलांना अनुभूती मिळाली.
या प्रदर्शनाचा आणि आठवडा बाजाराचा शुभारंभ लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्षा अलका बेडकिहाळ, व्यापारी विकास शहा आणि प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर उपस्थित होते.
मुलांनी शेवगा, भोपळा, मेथी, वांगी, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, कोथिंबीर आदी पालेभाज्या विक्रीसाठी थाटल्या होत्या. विशेष म्हणजे, राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून नावलौकिक मिळवलेल्या धुमाळवाडीचा आदर्श समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी डाळिंब, पेरू, अंजीर, बोरे, सिताफळ, पपई, चिकू, लिंबू, ड्रॅगन फ्रुट आदी फळांचा स्टॉलही लावला होता, याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. भाज्यांच्या खरेदीसोबतच वडापाव, सामोसे, व्हेज मंच्युरियन, पास्ता, इडली, उडीदवडा सांबर, पाणीपुरी आणि ढोकळा या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खवैय्यांनी अधिक पसंती देत चांगलाच ताव मारला.

या बाजारात मुलांनी केलेली आर्थिक व्यवहाराची उलाढाल त्यांच्या व्यवहार ज्ञानात निश्चित भर टाकेल, असा विश्वास व्यक्त करत, मान्यवरांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या अप्रतिम कलात्मक वस्तू आणि विविध छोटेमोठे विज्ञानाचे प्रयोग पाहून मुलांच्या जिज्ञासेचे कौतुक केले. इयत्ता सहावीतील साहिल सकट याने बनवलेल्या चांद्रयान प्रतिकृतीचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक सस्ते, बाळासो भोसले, किशोर पवार, धर्मराज माने, दिपाली निंबाळकर, विजया भोसले, हेमलता गुंजवटे, निलिमा मगदूम, शमीमबानु शेख, नीलम लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
