। लोकजागर । फलटण । दि. १४ डिसेंबर २०२५ ।
फलटण नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ८ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कु. सिद्धाली शहा यांच्या प्रचारासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. त्यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटले की, “कु. सिद्धाली शहा यांच्या रूपाने तुम्हाला उमदे नेतृत्त्व लाभले आहे. तुमच्या हक्काची लेक म्हणून तुम्ही तिला प्रचंड मतांनी विजयी करा.”
अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर या कु. सिद्धाली शहा यांच्या हाऊस टू हाऊस प्रचारावेळी मतदारांशी संवाद साधत होत्या. यावेळी कु. सिद्धाली शहा यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी मतदारांना सांगितले की, अनुप शहा यांच्या कामाचा वारसा पुढे नेण्यासाठी कु. सिद्धाली शहा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्या शासकीय योजनांचा लाभ, प्रभागातील मूलभूत समस्यांची सोडवणूक आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास यात कुठेही कमी पडणार नाहीत, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तोच विश्वास ठेवून तुम्ही त्यांना विजयी करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
शहरातील बदलांवर बोलताना त्यांनी सांगितले की, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून फलटण शहरात अमूलाग्र बदल आपल्याला करायचा आहे. प्रशासकीय दृष्ट्या फलटणला सर्व सुविधांयुक्त केले जात आहे. हा विकास आणखीन गतिमान करण्यासाठी फलटण नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता असणे आवश्यक आहे. त्यासाठीच आपल्या प्रभागातूनही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करा, असे महत्त्वपूर्ण आवाहन अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी प्रभाग ८ च्या मतदारांना केले.
