प्रभाग १ मध्ये अपक्ष उमेदवार अस्मिता लोंढे यांचा ‘डंका’! प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत नगरसेविका पदी दिमाखात निवड

। लोकजागर । फलटण । दि. २२ डिसेंबर २०२५ ।

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना कडवी झुंज देत अपक्ष उमेदवार सौ. अस्मिता भिमराव लोंढे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मतदारांनी त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास फलटणच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला असून, त्यांची नगरसेविका म्हणून निवड झाल्याने प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे.

निवडणुकीच्या निकालात सौ. लोंढे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि अखेर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली. त्यांच्या या यशाबद्दल प्रभागातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत हा विजय साजरा केला.

विजयानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना सौ. अस्मिता लोंढे म्हणाल्या की, “हा विजय माझा नसून प्रभाग १ मधील प्रत्येक मतदाराचा आहे. नागरिकांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे, त्याला मी तडा जाऊ देणार नाही. प्रभागातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने सोडवून सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.” तसेच महिला आणि युवकांच्या प्रश्नांवर विशेष भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सौ. अस्मिता लोंढे यांच्या या विजयामुळे प्रभाग क्रमांक १ च्या विकासाला आता नवी दिशा आणि नवा चेहरा मिळेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. एक उमदे आणि कामाला तत्पर असणारे नेतृत्व मिळाल्याने प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.

Spread the love