। लोकजागर । फलटण । दि. २९ डिसेंबर २०२५ ।
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रीमंत समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर हे आज सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारणार आहेत. सकाळी ११:०० वाजता नगरपरिषद कार्यालयात हा भव्य पदग्रहण समारंभ पार पडणार असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.
या विशेष कार्यक्रमाला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहून समशेरदादांना शुभेच्छा देणार आहेत. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्यासोबतच प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, ॲड. नरसिंह निकम, सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, सौ. प्रतिभाताई शिंदे, अमरसिंह नाईक निंबाळकर, सौ. मनिषाताई नाईक निंबाळकर आणि ऐश्वर्याराजे नाईक निंबाळकर यांसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समशेरदादांच्या नेतृत्वाखाली फलटण शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा मतदारांमध्ये आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आणि शहरवासीयांनी सकाळी ११ : ०० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे माजी गटनेते अशोकराव जाधव यांनी केले आहे. या पदग्रहण सोहळ्यामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
