विषय समित्यांच्या निवडीसाठी आज विशेष सभा; ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेने साताऱ्याचे राजकीय वातावरण तापले.
। लोकजागर । फलटण । ०४ एप्रिल २०२६ ।
सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी आज, ४ एप्रिल रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून ही सभा संपेपर्यंत या परिसरात कडक निर्बंध लागू राहतील. या आदेशानुसार नवनिर्वाचित सदस्य, शासकीय कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणाही व्यक्तीला या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या हायव्होल्टेज ड्रामानंतर आता समाज कल्याण, महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, तसेच बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती पदांसाठी ही निवडणूक होत आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करणे, त्यानंतर अर्जांची छाननी आणि दुपारी १ वाजेनंतर आवश्यकता भासल्यास हात उंचावून मतदान प्रक्रिया राबवून निकाल जाहीर केला जाणार आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना मतदानापूर्वीच अटक करण्यात आल्याने निर्माण झालेला पेच आणि सातारा पोलिसांच्या भूमिकेवर झालेली टीका या पार्श्वभूमीवर, आजची ही निवड प्रक्रिया अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.
