महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे होणार 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण

। लोकजागर । फलटण ।

‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. रवींद्र चव्हाण व ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकमत’ चे समूह संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात सोमवार, दि.6 जानेवारी 2025 रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी स.10:30 वा. आयोजित केला आहे. या कार्यक्रमास रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना विजय मांडके यांनी सांगितले की, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभुर्ले – जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ आणि जांभेकर कुटूंबिय यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी संस्थेच्या पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन व राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण केले जाते. यंदा या पुरस्कारांचे 32 वे वर्ष असून या समारंभात सन 2024 च्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कारां’चे वितरण होणार आहे. यामध्ये श्रीकांत रामभाऊ साबळे (आवृत्ती संपादक, दै.पुण्यनगरी, पुणे), दिपक एस. शिंदे (आवृत्ती प्रमुख, दैनिक लोकमत, सातारा), नवनाथ कुताळ (प्रतिनिधी, दै.दिव्यमराठी, श्रीरामपूर), सौ.विमल विठ्ठलराव नलवडे (संपादिका, सा.धनसंतोष, कोरेगाव, जि.सातारा), अ‍ॅड.रोहित शामराव अहिवळे (संपादक, दै.गंधवार्ता, फलटण), यशवंत भिमराव खलाटे – पाटील (प्रतिनिधी, दै.पुण्यनगरी, फलटण), आचार्य बाळशास्त्री जांभेकर महिला ’दर्पण’ पुरस्कार श्रीमती शोभना कांबळे, वरिष्ठ उपसंपादक, दैनिक लोकमत, रत्नागिरी ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय धाडसी पत्रकार’ पुरस्कार – डॉ.प्रमोद श्रीरंग फरांदे (वरिष्ठ उपसंपादक, दै.सकाळ, सातारा), आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण’ साहित्यिक पुरस्कार – निर्मलकुमार सूर्यवंशी (रा.हडसणी, ता.हदगाव, जि.नांदेड) यांचा समावेश आहे.

‘दर्पण’कारांच्या जन्मभूमीत ‘दर्पण’ स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमास ‘दर्पण’कारांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, माध्यमप्रेमी नागरिक व पोंभुर्ले पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ.प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, जांभेकर कुटूंबियांच्यावतीने सुधाकर जांभेकर यांनी केले आहे.

Spread the love