के.बी.ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन यादव यांना ‘शरद कृषी उद्योजक पुरस्कार’

| लोकजागर | फलटण | दि. ०१ फेब्रुवारी २०२५ |

कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल के. बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन यादव यांना ‘शरद कृषी उद्योजक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते रविवार, दि. 2 फेब्रुवारी रोीजी लोणंद येथील शरद कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात होणार आहे.

सचिन यादव यांचा जन्म 24 डिसेंबर 1977 रोजी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शिरवली ता. बारामती येथे झाला. वडिलांचा शेती व्यवसाय असल्यामुळे त्यांची शेतीशी बालपणापासूनच नाळ जोडली गेली होती. महात्मा गांधी बालक मंदिर, बारामती व कृषी कॉलेज, पुणे येथे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी शेती क्षेत्रात आपली कारकिर्द सुरू केली.

2008 साली, सचिन यादव यांनी फलटण तालुक्यात के. बी. एक्सपोर्टस इंटरनॅशनलची पायाभरणी केली. शेतकर्‍यांना रेसिड्यू फ्री उत्पादनांची माहिती पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि एक्स्पोर्ट संदर्भात मार्गदर्शन केले.

सचिन यादव यांनी के. बी. बायो आरमनिक्स प्रा. लि. कंपनीची स्थापना करून वनस्पतीजन्य जैव कीटकनाशके बनवली. यामुळे शेतकर्‍यांना निरोगी व निर्यातक्षम कृषीमालाचे उत्पादन मिळवण्यासाठी बाजारात एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. युरोपियन मार्केटमध्ये भेंडी, डाळिंब, बेबीकॉर्न, आंबे, कडीपत्ता, दुधी यांची निर्यात केली जात आहे, तसेच ड्रॅगन फ्रुट देखील निर्यात करत आहेत.

कंपनीने फलटण, बारामती, पुरंदर, इंदापूर, माणखटाव, माळशिरस तालुक्यातील हजारो कामगारांना रोजगार दिला. 14 प्रमुख राज्यांमध्ये कंपनीची सुरुवात केली आणि इंदोर व दिल्ली येथे ऑफिस स्थापन केली. कोरोना महामारी व महापुरात कंपनीतर्फे लोकांना मदतीचा हात दिला. त्यांनी घरगुती वापरासाठी आवश्यक असणार्‍या धान्य, किराणा स्वरूपात किट वाटप सरांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले.

100 एक्स आयुर्वेदा प्रा. लि. या नवीन कंपनीची स्थापना करून आयुर्वेदिक उपचारांसाठी काम सुरू केले. वनस्पतींचा वापर करून बनविलेली कीटकनाशकांचा यशस्वी व क्रांतिकारी प्रयोग झाल्यानंतर, मानवी जीवनातील दुर्धर आजार व रोगांवर उपचार करण्यासाठी ही कंपनी कार्यरत आहे.

Spread the love