नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी मुंबईत साजरी
। लोकजागर । मुंबई । दि. 0५ फेब्रुवारी २०२५ । (रवींद्र मालुसरे ) :
जो देश इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोलही बिघडतो. एव्हढेच नव्हे तर त्या देशातील माणसे इतिहास घडवण्याची क्षमता सुद्धा निर्माण करू शकत नाहीत. दुर्दैव म्हणजे १९४७ नंतर आपला खरा इतिहास दडवून ठेवला गेला. नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज म्हणून मुंबईत हा शौर्य दिन मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करीत आहात तो हा क्षण आमच्यासाठी सुद्धा अभिमानाचा आहे. त्या निमित्ताने तुम्ही इतिहासाची उजळणी करीत आहात असे भावपूर्ण उद्गगार वीरमाता अनुराधा गोरे यांनी काढले.
शिवसेना शाखाप्रमुख क्रमांक २० चे विजय मालुसरे आणि मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शौर्य दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या पुढे असेही म्हणाल्या की, ३५० वर्षांपूर्वी इतिहास घडवलेल्या एका पिढीचे तुम्ही वारस आहात हे कदापि विसरू नका. छत्रपतीं शिवाजी महाराजांचा जन्म पारतंत्र्यात झाला होता. सगळीकडे अंधार दाटला असताना वीज चमकावी तसा त्यांचा जन्म आहे, शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी आणि नंतरही अनेक साम्राज्ये आपल्या देश जन्माला आली. परंतु कालांतराने ती खालसा झाली. शिवाजी महाराजांच्या बाबतीत मात्र तसे झाले नाही. शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या रक्तात जे स्वातंत्र्याचे आणि स्वराज्याचे बीज पेरले होते त्याचा त्यांच्यानंतर वडणावळ झाला. त्यातून पुढे दिल्लीचे तख्त तर आपल्या अंकित तर राहिलेच याशिवाय मराठा सैन्याने अटकेपार झेंडे लावले. आपण गुलाम आहोत अशी आपल्याला कायम शिकवण दिली गेली. परंतु तसा इतिहास आपला कधीच नव्हता. या देशात मुस्लिम शासक जसे होते तसे हिंदू राजांचे साम्राज्येंही प्रचंड मोठी आणि समृद्ध होती. आपले पूर्वज लढायला प्राधान्य महत्व देत होते, त्यांच्या हातात जोपर्यंत शस्त्र होते तोपर्यंत भारत मोठा होता. त्यासाठी कोट्यवधी भारतीयांनी देश देव धर्मासाठी बलिदान दिले होते. हे सर्व लक्षात ठेऊन पूर्वजांचे आणि इतिहासाचे स्मरण करण्यासाठी तुम्ही जे करीत आहात ते सर्वांसाठी महत्वाचे आहे. यापुढच्या पिढीने इतिहास समजून घेतल्याशिवाय आपल्याला नवा इतिहास घडवता येणार नाही. आपल्या सिमेपलीकडे जेव्हढी शत्रू आहेत त्यापेक्षा देशात जास्त शत्रू देशांतर्गत आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या.
यावेळी भारतीय सैन्यदलातील निवृत्त कॅप्टन अशोक शिंदे, सुभेदार वामन बांदल, मधुकर घाडगे, रवींद्र केसरकर, हवालदार रवींद्र मालुसरे, प्रदीप मालुसरे, सोपान जाधव, पांडुरंग जाधव या सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेले शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक परब आपल्या भाषणात म्हणाले की, आजच नव्हे तर नेहमीच इतिहासाची आठवण करणेचे गरजेचे आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत इतिहासाला दुय्यम स्थान दिले जात आहे. इतिहास पुरुषांनी जो इतिहास घडवला त्यांचे स्मरण तुम्ही करता आहात हे अत्यंत महत्वाचे आहे. सत्कार करण्यात आलेल्या शूर सैनिकांना मी मानाचा मुजरा करतो.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ हेमंतराजे गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की, १७व्या शतकात भारतात प्रवास करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगिज, डच आणि फ्रेंच प्रवाशांनी छत्रपती श्रीशिवाजीमहाराजांची तुलना अनेक योद्ध्यांशी केलेली आहे. इतिहासाचा अभ्यासक आणि लेखक म्हणून माझ्या आयुष्यातील उत्साहवर्धक बाब म्हणजे ज्यांच्या नावापुढे ‘दि ग्रेट’ हे बिरुद लावलं जात अशा विश्वविख्यात व्यक्तींच्या नामावलीत छत्रपती श्रीशिवाजीमहाराजांच्याही नावाचा समावेश आहे. हे अभ्यासांती लक्षात आल्यानंतर मी याची दखल घेऊन शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट हे पुस्तक लिहिले. याचा अभ्यास करताना मला आढळले की, ज्या घटनांचा आवाका जगाला हादरविणारा होता, अशा घटनांचा प्रत्यक्ष अनुभव शिवाजीमहाराजांनी केवळ एकाच जीवनावकाशात कसा घेतला, ज्यांचे ठायी दौर्बल्य जवळ जवळ नव्हतेच, आणि आपले राज्य शक्तीशाली करणे आणि आपल्या जनतेला सामाजिक अरिष्टांतून मुक्त करणे हे आपले ध्येय त्यांनी कसे साध्य केले. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्यासारखे अनेक शूरवीर मावळे त्यांच्या पदरी होते. त्यामुळे प्रतापगड, सिंहगड, विशाळगड यांच्यासारख्या अनेक लढाया ते जिंकू शकले. त्यांचे स्मरण करण्यासाठी शिवचरित्राचा ध्यास घेतलेल्या माझ्यासारख्याला आमंत्रित केले याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो.
विंग कमांडर शशिकांत ओक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य गाथेवर आधारित ५७ स्लाईड्सशो बनवले आहेत ते उपस्थित विद्यार्थी आणि शिवप्रेमींना दाखवण्यात आला. त्यावेळी सिंहगडाची मोहीम आणि तान्हाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे आणि उदयभानु यांच्यात लढाई कशी लढली गेली याचे वैशिष्ठ्यपूर्ण शैलीतून साधार सूत्रसंचालन त्यांनी केले. तत्कालीन संदर्भस्थानांचा आधार घेत शिवकालीन लढायांचा सविस्तर अभ्यास मांडताना त्यांनी ऐतिहासिक लढाईतून बोध घेऊन युवा पिढीचे राष्ट्रप्रेम जागृत व्हावे असे आवाहन केले. निर्भय भारत सामाजिक संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते अंकुश गणपतराव मालुसरे, शिवसेना उबाठा पक्षाचे विधानसभा प्रमुख संतोष राणे यांचीही समयोचित भाषणे झाली. शिवसेना शाखाप्रमुख विजय पांडुरंग मालुसरे हे शिवचत्रित्राचा ध्यास घेऊन या दिवशी दरवर्षी हा शौर्यदिन साजरा करीत असतात त्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
शिवसेना विभागप्रमुख अजित भंडारी, महिला संघटक मनालीताई चौकीदार, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष श्री.रविंद्र मालुसरे, मालुसरे ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिपेश मालुसरे, विधानसभा संघटक राजन निकम, मनोज मोहिते, राजू खान, उपविभाग प्रमुख अनंत नागम, शाखाप्रमुख गणेश मालुसरे, हवालदार राजेंद्र मालुसरे, पत्रकार अनिल चासकर, श्याम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक आणि शिवसेना पोलादपूर तालुका प्रमुख अनिल ज्ञानोबा मालुसरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कांदिवली,बोरिवली विभागातील शिवसेना उ.बा.ठा. चे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते,शालेय विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. उस्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या शिवचरित्र रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.