। लोकजागर । फलटण । दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ।
येथील रेव्हेन्यू क्लबचे पुर्ननिर्माण करण्यात येणार असून या कामासाठी शासनाने १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हे काम दूरदृष्टीने योजून राज्य सरकारकडून या कामाला मंजूरी मिळवल्याबद्दल माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांचे रेव्हेन्यू सबोर्डिनेट वेलफेअर फंड कमिटी, फलटणच्यावतीने सदर कमिटी अध्यक्ष तथा फलटणचे निवासी नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे व कमिटी सचिव तथा मिरढे गावचे तलाठी लक्ष्मण अहिवळे यांनी आभार मानले आहेत.
फलटण शहरातल्या जुन्या ‘रेव्हेन्यू क्लब’ च्या जागेवर नवीन ‘महसूल भवन’ उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजर झाला असल्याची माहिती रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत काल दिली होती.
अभिजीत सोनवणे व लक्ष्मण अहिवळे यांनी नमूद केले आहे की, ‘‘रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून फलटण तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या रेव्हेन्यू क्लबल्या पूर्णत: मोडकळीस आलेल्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत मंजूर करुन त्यास दहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या मंजूर कामामुळे फळटण तालुक्यातील सर्व महसुल कर्मचार्यांना तालुक्याच्या ठिकाणी कोणत्याही कामासाठी आल्यावर हक्काचे कार्यालय मिळणार आहे. तसेच महसूल विभागाकडे कामासाठी तालुक्यातील कानाकोपर्यातून आलेल्या शेतकरी बांधवांना महसूल विभागाचे कर्मचारी एकाच छताखाली या ठिकाणी भेटतील. ही बाब विशेष महत्त्वाची आहे.’’