फलटणला दि.१२ रोजी संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन

रेठरेच्या जयश्री कारंडे यांना श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज गौरव पुरस्काराचे होणार वितरण

। लोकजागर । फलटण । दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ।

येथील श्री संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळ्याचे बुधवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण येथे आयोजन केले असून या कार्यक्रमात रेठरे (ता.कराड) येथील सौ. जयश्री कारंडे यांना श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा कार्तिक स्वामी आश्रम देवदरी, अंभेरीचे संस्थापक अध्यक्ष प.पू.परशुरामजी महाराज वाघ यांच्या हस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष भोलेनाथ भोईटे यांनी दिली.

या कार्यक्रमास सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सजन हंकारे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ अ‍ॅड. प्रतिक देशमाने, शासकीय मेडिकल कॉलेज, बारामतीचे सदस्य संतोष सातपुते, कोरेगाव कुमठेचे सरपंच संतोष चव्हाण, पुणे येथील नेत्र तज्ज्ञ डॉ. विकास कुंभार, कामगार विमा विभागाचे माजी उपसंचालक ज्ञानेश्‍वर भगत, पत्रकार अशोक सस्ते, यशवंत खलाटे, युवराज पवार, सेवासुख वधूवर सूचक केंद्र, साताराचे सचिव गणपतराव भोसले, सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते शशीकांत भोसले यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज गौरव पुरस्काराच्या मानकरी सौ. जयश्री राजकुमार कारंडे या रेठरे खुर्द (ता.कराड, जि. सातारा) येथील असून त्यांनी चर्मकार संघटनेचे चार वर्षे जिल्हाध्यक्षपद, तीन वर्षे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्षपद भूषवले आहे. चर्मकार समाजाला वेगवेगळ्या सुविधा मिळवून देणे, बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळवून देणे आदी सामाजिक कार्यात त्या सक्रीय आहेत. मानवाधिकार संघटनेचे तीन वर्षे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असेही संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

तरी या जयंती सोहळ्यास चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्टचे , उपाध्यक्ष अरुण खरात, रोहिदास पवार, सचिव हृदयनाथ भोईटे, कृष्णात बोबडे यांनी केले आहे.

Spread the love