जीबीएस बाधित रुग्णाच्या कुटूंबियांची आ. सचिन पाटील यांनी भेट घेवून त्यांना आधार दिला.
प्रत्यक्ष भेट देवून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला दिल्या सक्त सूचना
। लोकजागर । फलटण । दि. १४ फेब्रुवारी २०२५ ।
बहुचर्चित ‘जीबीएस’ चा रुग्ण फलटण तालुक्यातल आसू येथे सापडला असून परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान काल (दि. १३ रोजी) आमदार सचिन पाटील यांनी गावात भेट देऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना पंचायत समितीच्या अधिकारी व ग्रामपंचायतला दिल्या आहेत.

आसू गावातील सार्वजनिक स्वच्छतेच्या व्यवस्थेची पाहणी करुन सूचना देताना आ. सचिन पाटील.
आसू येथील विराज सतीश पवार, वय 13 वर्षे यांस जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. याच्या कुटुंबियांची घरी जाऊन आ.सचिन पाटील यांनी भेट घेतली व त्यांना आधार दिला. तसेच आसू गावातील पशुवैधकीय केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गावातील गटार, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था, स्वच्छता तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व पशुवैद्यकिय अधिकारी यांचेकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनात आले असता याची गंभीर दखल घेऊन त्यांना कामात कुसूर करू नये व नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. योग्य ती खबरदारी घ्या अशा सक्त सूचना आ. सचिन पाटील यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी कुंभार, तालुका आरोग्य अधिकारी दिघे, भाजप तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, विशाल माने, अमोल लवळे, आसू गावचे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, सध्या फलटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये जुलाब व उलट्यांची साथ असून स्वच्छता आणि पाण्याबाबत नागरीकांनी योग्य ती काळजी असे आवाहन पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.