तब्बल ७० वर्षांनी दिल्लीत रंगणार सोहळा
। लोकजागर । नवी दिल्ली । २० फेब्रुवारी २०२५ ।
मराठी भाषा, तिचा समृद्ध वारसा आणि साहित्य क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 70 वर्षांनी राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे हे 98 वे संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान पार पडणार असून साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर भूषविणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे तब्बल 70 वर्षांनंतर होऊ घातलेले 98 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. मराठीला अनेक वर्षांच्या मागणीनंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या संमेलनाचे महत्त्व मराठी मनाच्या दृष्टीकोनातून अधोरेखित होत आहे. ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी कट्टा, मुलाखती अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी साहित्य संमेलन रंगणार आहे. अभिजात मराठी भाषेचा जागरही संमेलनात होणार आहे.
शुक्रवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवस चालणार्या या साहित्य संमेलनातील विविध कार्यकमांसाठी संमेलनस्थळी महात्मा जोतिराव फुले सभामंडप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप, यशवंतराव चव्हाण सभामंडप उभारण्यात आले असून संमेलनाचा समारोप रविवारी (दि.23) सायंकाळी साडेचार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, मराठी भाषामंत्री उदय सामंत, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथदिंडी प्रारंभ, ध्वजारोहण
संमेलनस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे दि. 21 रोजी सकाळी 9:30 ते 11 या वेळेत ग्रंथदिंडी प्रारंभ आणि ध्वजारोहण होणार असून याचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नॅशनल बुक ऑफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे चेअरमन प्रा. मिलिंद मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार ओत. यावेळी 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
उद्घाटन समारंभ
दि. 21 रोजी दुपारी 3:30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन पार पडणार असून यावेळी संमेलन स्वागताध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत उद्घाटनाचे दुसरे सत्र संपन्न होणार असून यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, माहिती व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी डॉ. रवींद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण तर डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण संपन्न होणार आहे.
निमंत्रितांचे कवी संमेलन
दि. 21 रोजी सायंकाळी 7:30 ते रात्री 10 या वेळेत इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न होणार आहे.
दि. 22 रोजीचे कार्यक्रम
दि. 22 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे सकाळी 10 ते 12 या वेळेत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून यात रवी पंडित, हणमंतराव गायकवाड, पराग करंदीकर यांच्याशी संवाद होणार आहे. यावेळी साहित्य अकादमीचे सचिव डॉ.के.श्रीनिवासन विशेष पाहुणे लाभणार असून मुलाखतीचे संचालन प्रसन्न जोशी करणार आहेत.
दुपारी 12 ते 2 या वेळेत ‘मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी संसार’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये डॉ. ज्ञानेश्वर मुळे, डॉ. साधना शंकर, राजदीप सरदेसाई, सागरिजा घोष, रेखा रायकर, मनोज कुमार, डॉ.मंजिरी वैद्य, प्रसन्ना अय्यर हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भारती विद्यापीठ, पुणेचे कार्यवाह आ.डॉ.विश्वजीत कदम विशेष पाहुणे असणार असून अस्मिता पांडे, बाळ कुलकर्णी हे संवादक असणार आहेत.
दु.2 ते 2:30 श्रीमंत संजीवनी खेर, दत्तात्रय पाष्टे, श्रीमती कपल पाटे यांचा प्रा.उषा तांबे यांच्या हस्ते विशेष सत्कार संपन्न होणार आहे.
दुपारी 4 ते 5:30 वा. ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ या विषयावर जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडणार असून यामध्ये डॉ.समीर जाधव, धीरज वाटेकर, शैलेश पांडे, सुरेश भटेवरा, संजय आवटे सहभागी होणार आहेत.
सायं. 6 ते 8 या वेळेत मधुरा वेलणकर यांचा मधुरव कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दि.22 रोजी यशवंतराव चव्हाण सभामंडप येथे दु.12:30 ते 2 यावेळेत डॉ.अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कविसंमेलन, दु.2:30 ते 4 या वेळेत ‘आनंदी गोपाळ’ ही परिचर्चा डॉ. राजेंद्र वाटाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात डॉ.समीता जाधव, सुनील पाटील, चित्रा वाघ, डॉ. वंदना चव्हाण, डॉ. तेजस चव्हाण सहभागी होणार आहेत.
सायं. 4 ते 5:30 या वेळेत ‘बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन व साहित्य’ या विषयावर अर्चना मिरजकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिसंवादात अलकनंदा साने, मयूरेश वाटवे, अवधूत सामंत, डॉ.अनुराग लव्हेकर सहभागी होणार आहेत.
सायं. 5:30 ते 7 या वेळेत ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ या परिसंवादात श्रीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रीपाद अपराजित, डॉ. अनिरुद्ध मोरे, अरुण देशपांडे, संजय सोनवडी, प्रभाकर ओव्हाळ सहभागी होणार आहेत.
दि. 23 रोजीचे कार्यक्रम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात स.10 ते 12 या वेळेत ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू, डॉ.निलम गोर्हे यांच्या मुलाखती होणार असून राजीव खांडेकर, प्रवीण बर्दापूरकर मुलाखत घेणार आहेत.
दु.12 ते 2 या वेळेत ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य’ हा परिसंवाद अशोक वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यामध्ये प्रतिभा बिस्वास, डॉ.कोमल ठाकरे, मोहीब कादरी, विश्वास ठाकूर सहभागी होणार आहेत.
दु.2:30 ते 3:30 वाजता ‘नाते दिल्लीशी मराठीचे विशेष सन्मान’ या कार्यक्रमात वसुंधरा राजे सिंधिया (शिंदे), ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भूषणराजे होळकर, शुभंगिनीराजे गायकवाड हे सहभागी होणार असून मिलिंद खांडेकर या कार्यक्रमाचे संचालन करणार आहेत.
महात्मा जोतीराव फुले सभामंडपात स.9 ते दु. 2 व सायं. 5 ते रात्री 9 या वेळेत कवी कट्टा संपन्न होणार असून याचे उद्घाटन डॉ. नीलम गोर्हे यांच्या हस्ते होणार असून यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संयुक्त सचिव प्राजक्ता लवंगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यशवंतराव चव्हाण सभामंडपात स.10 ते 11:30 वा. ‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत’ हा प्रफुल्ल शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित केला असून यामध्ये डॉ. पृथ्वीराजतौर, सुनीता डागा, दीपक बोरगावे, यिजय नाईक सहभागी होणार आहेत.
दु.12 ते 1:30 वा. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व सर्जनशीलता’ हा परिसंवाद सौरभ करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यामध्ये बालाजी सुतार, सम्राट फडणीस, श्रीमंत माने, डॉ.राजेश खरात, डॉ.अनिल मडके मार्गदर्शन करणार आहेत.
महात्मा जोतीराव फुले सभामंडपात स.9:30 ते दु. 2 या वेळेत कवी कट्टा संपन्न होणार असून यावेळी कवी कट्टा प्रमुख राजन लाखे, समन्वयक गोपाळ कांबळे, डॉ. मनोज वराडे उपस्थित राहणार आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे खुले अधिवेशन व संमेलन समारोप सायं. 4:30 ते रा. 8 या वेळेत होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, राज्याचे मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत, डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ज्ञानपीठ पुरस्कार समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त साहू अखिलेश जैन, ग्रेटर काश्मीर, काश्मीर उजमाचे मुख्य संपादक फयाज कल्लू यांचा विशेष सत्कार होणार असून ठरावांचे वाचन, आभार प्रदर्शन आणि पसायदानाने संमेलनाचा समारोप होणार आहे.