कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणार्‍या दोघांवर गुन्हा

। लोकजागर । फलटण । दि. २२ फेब्रुवारी २०२५ ।

दोन जर्शी गायी कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या विडणी (ता.फलटण) येथील दोघांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम व मोटरवाहन अधिनियम अंतर्गत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फलटण – ते सातारा रोडवरील वाठार फाटा येथे एक पांढर्‍या रंगाचे सुपर कॅरी वाहन क्रमांक एम.एच.११ डी.डी. २१५६ यामध्ये हौद्यात काळ्या रंगाची जर्शी गाय (अंदाजे वय ४ वर्षे) व दुसरी काळ्या व पांढर्‍या रंगाची जर्शी गाय (अंदाजे वय ४ वर्षे) अशा दोन गायींना दोरीने बांधून त्यांना अन्न, पाणी व चारा यांची सोय न करता तसेच वैद्यकीय तपासणी न करता कत्तलीसाठी घेऊन जात असताना अमोल भिवा जाधव (वय ३५) व महादेव हणमंत गुजले दोघेही रा. विडणी, ता. फलटण हे आढळून आले. याबाबतची खबर गोरक्षक तथा मानद प्राणी कल्याण अधिकारी सौरभ सोनवले यांनी फलटण ग्रामीण पोलीसांना दिली. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love